वीज कामगार ते आमदार!
By Admin | Updated: October 26, 2014 00:42 IST2014-10-26T00:42:51+5:302014-10-26T00:42:51+5:30
संघर्षयात्री आमदार बळीराम भगवान सिरस्कार.

वीज कामगार ते आमदार!
सुरेश नागापुरे / पारस, अनंत वानखडे / बाळापूर
वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे छत्र हरवले..कुटुंबाला हातभार लागावा, यासाठी तो पारससारख्या खेड्यातून चंद्रपूरसारख्या शहरात जातो.. औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कंत्राटी वीज कामगार म्हणून काम करतो.. बहुजन समाजाप्रती बांधीलकीच्या भावनेतून तो समाजकारणात उडी घेतो.. प्रसंगी राजकाणारतही येतो.. पुढे भारिप-बमसंकडून विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातून निवडणूक लढवितो.. दिग्गजांचा पराभव करून हा युवक आमदार होतो.. या संघर्षयात्री युवकाचे नाव आहे बळीराम भगवान सिरस्कार. बळीराम सिरस्कार यांच्या वडिलांचे ते पाच वर्षांचे असतानाच निधन झाले. त्यामुळे त्यांची आई गंगूबाई यांच्यावर मुलगा बळीराम, वसंतराव, रामराव, विष्णू आणि मुलगी यशोदा यांच्या पालनपोषणाची जबाबदारी येऊन पडली. सर्व भावंडांनीही आईसोबत कष्ट केले. एकीकडे बळीराम हे पारस येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण घेत असताना दुसरीकडे ते शेतातही राबले. मात्र तरीही निर्वाह होत नव्हता. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ते दहावीपर्यंतच शिकू शकले. १९८0 च्या दशकात त्यांनी चंद्रपूर गाठले. ते चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगार म्हणून रुजू झाले. काही वर्षांनी ते पारस येथे परतले. आर्थिक परिस्थितीमुळे आपण शिकू शकलो नाही, याची खंत त्यांना होती. त्यामुळे बहुजन समाजाच्या सर्वांगीण उद्धारासाठी काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात सातत्याने येत होता. यासाठी राजकारणात उडी घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १९८९ मध्ये राजकारणात उडी घेत ग्रामपंचायत निवडणूक लढवून ते विजयी झाले. १९९0 साली त्यांनी भारिप-बमसंमध्ये प्रवेश केला.ते भारिपचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. २00२ मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये महापूर आला. ते पूरग्रस्तांसाठी अहोरात्र झटले. २00९ मध्ये पक्षाने त्यांना जि.प. निवडणुकीत उमेदवारी दिली नाही. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराज न होता ते निष्ठेने पक्षाचे काम करीत राहिले. त्यामुळे नंतर झालेल्या विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यांना २0१४ च्या निवडणुकीत पुन्हा संधी देण्यात आली. ते दुसर्यांदा विजयी झाले.