Power theft revealed at Patur's city president! | पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!
पातूरच्या नगराध्यक्षांच्या घरी वीज चोरी उघडकीस!

पातूर: पातूर शहराच्या नगराध्यक्ष प्रभा भीमराव कोथळकर यांच्या निवासस्थानी महावितरण कंपनीच्या वाशिम येथील भरारी पथकाने गुरुवारी दुपारी अचानक छापा टाकून,वीज मीटरमधून होणारी वीज चोरी पकडली.
या प्रकरणात वीज चोरी कायदा कलम १३५ नुसार लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाशिम येथील भरारी पथकाला पातूरच्या नगराध्यक्ष प्रभा कोथळकर यांच्या निवासस्थानी इलेक्ट्रिक मीटरसोबत छेडछाड करून विजेची चोरी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने नगराध्यक्ष कोथळकर यांच्या निवासस्थानी छापा टाकून इलेक्ट्रिक वीज मीटरची तपासणी केली. तपासणी दरम्यान पथकासमोर वीज चोरी असल्याचे उघड झाले . नगराध्यक्षांच्या घरी नेमकी किती रुपयांची वीज चोरी झाली, याची माहिती मिळू शकली नाही. यासंदर्भात लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली. विशेष म्हणजे, ही कारवाई अत्यंत गुप्तपणे करण्यात आली. महावितरण कंपनीने यासंदर्भातील तपशील सध्यातरी उघड केलेला नाही. महावितरणच्या भरारी पथकाने काही दिवसांपूर्वी एका ढाब्यावरसुद्धा कारवाई केली होती. (तालुका प्रतिनिधी)

अधिकारी म्हणतात, कारवाई केली!
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना, नगराध्यक्षा कोथळकर यांच्या घरी केलेल्या कारवाईला दुजोरा दिला आहे; परंतु कारवाईची माहिती काही दिवसांतच प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

आम्ही लग्नाला गेलो होतो. कारवाईचा फोन आला; परंतु काय कारवाई झाली, याची माहिती नाही. कारवाई केल्याचा पंचनामा मिळालेला नाही. त्यामुळे यावर काही भाष्य करू शकत नाही.
-प्रभा कोथळकर, नगराध्यक्ष पातूर नगर परिषद.

Web Title: Power theft revealed at Patur's city president!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.