१ कोटी १४ लाख परत जाण्याची शक्यता
By Admin | Updated: March 22, 2016 02:17 IST2016-03-22T02:17:53+5:302016-03-22T02:17:53+5:30
आकोट शहरातील अंगणवाडी बांधकामाचा मुहूर्त सापडेना; शिवसेनेने पाठविले पंकजा मुंडेंना निवेदन.

१ कोटी १४ लाख परत जाण्याची शक्यता
आकोट (जि. अकोला) : शहरातील एकात्मिक बालविकास सेवा अकोला अंतर्गत (शहर) आकोट येथील नागरी प्रकल्पाच्या १९ अंगणवाडी केंद्राच्या बांधकामाचा निधी १ कोटी १४ लाख रुपये १ वर्षापूर्वी प्राप्त झाला. मात्र अंगणवाडी केंद्रांच्या बांधकामाचा मुहूर्त अद्यापही प्रशासनाला सापडला नाही. त्यामुळे हा निधी आता परत जाणार असल्याची भीती व्यक्त होत असून, शिवसेनेने त्यावर आता आक्रमक पवित्रा घेत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन पाठविले आहे. आकोट पालिकेने अंगणवाड्या बांधकामासाठी जागा निश्चित करून एका दैनिकामध्ये बांधकामाच्या निविदा (पहिली आणि दुसरी) प्रसिद्ध केल्या होत्या. दरम्यान, आकोटात झालेल्या शिबिरात शिवसेना उपशहरप्रमुख विजय ढेपे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. यावर तत्कालीन मुख्याधिकार्यांनी फाइलीमध्ये प्रशासकीय त्रुटी आहेत, ते दुरुस्त करून प्रस्ताव सादर करतो, असे सांगितले होते. मात्र, अनेक महिन्याचा अवधी झाल्यानंतरही याबाबत कोणतेच पाऊल उचललेले दिसत नाही. चिमुकल्यांना लहानपणीच चांगल्या दर्जेदार इमारतीत शिक्षण मिळावे, हे शासनाचे धोरण असताना त्यासाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. याला आकोट पालिकेने केराची टोपली तर दाखविली नाही ना, अशी शंका शिवसेनेने व्यक्त केली आहे.