‘सर्वोपचार’च्या प्रतीक्षागृहातील ‘पीओपी’ कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2017 20:18 IST2017-05-14T20:18:31+5:302017-05-14T20:18:31+5:30
अकोला : सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या प्रतीक्षागृहाच्या छताचे प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी) कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली.

‘सर्वोपचार’च्या प्रतीक्षागृहातील ‘पीओपी’ कोसळले
तीन जखमी: शनिवारी मध्यरात्री घडली घटना
अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या प्रतीक्षागृहाच्या छताचे प्लास्टर आॅफ पॅरीस (पीओपी)अचानकपणे कोसळल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या घटनेत एक पुरुष व दोन महिलांसह तीन जण जखमी झाले.
सर्वोपचारमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या निधीतून येथे प्रतीक्षागृह उभारण्यात आले आहे. रुग्णांचे नातेवाईक या प्रतीक्षागृहाचा वापर करतात. येथे रात्री झोपणाऱ्यांचीही संख्या मोठी असते. शनिवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास या प्रतीक्षागृहातील छताला असलेल्या ‘पीओपी’चा एक मोठा भाग अचानकपणे कोसळला. यावेळी प्रतीक्षागृहात रुग्णांचे नातेवाईक झोपलेले होते. रात्री अचानकपणे पीओपीचा भाग झोपलेल्या लोकांच्या अंगावार कोसळला. यावेळी प्रतीक्षागृहात १५ ते २० जण झोपलेले होते. त्यापैकी तीघांना गंभीर जखमा झाल्या. वर्धा जिल्ह्यातील रिता प्रमोदराव थोटे या महिलेच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, त्यांना १२ टाके पडले. या व्यतिरिक्त आणखी एक महिला व पुरुष या घटनेत गंभीर जखमी झाले. इतरांनाही किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार करण्यात आले असून, त्यांना सुटी देण्यात आल्याचे ‘सर्वोपचार’ प्रशासनाकडून सांगण्यात आले. सदर प्रतीक्षागृहाच्या दुरुस्ती-देखभालीची जबाबदारी शिवसेनेकडे असल्यामुळे सर्वोपचार प्रशासनाने या घटनेबाबत शिवसेनेला कळविण्यात आल्याचे उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सांगितले.