राजकीय पक्ष, उमेदवारांना मतं विभाजनाचा धसका!
By Admin | Updated: September 28, 2014 01:55 IST2014-09-28T01:55:54+5:302014-09-28T01:55:54+5:30
अकोला जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये यंदा पंचरंगी लढत रंगण्याची शक्यता.

राजकीय पक्ष, उमेदवारांना मतं विभाजनाचा धसका!
अजय डांगे / अकोला
महायुती आणि आघाडीचीही शकलं झाल्याने, सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या वाढली आहे. एरव्ही दुरंगी, फार तर तिरंगी लढत पाहणार्या जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये यंदा पंचरंगी लढत रंगण्याची शक्यता दिसत आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास, मतांचे विभाजन मोठय़ा प्रमाणात होणार असून, ते रोखण्याचे आव्हान पक्षांप्रमाणेच उमेदवारांसमोरही राहणार आहे.
स्वतंत्र लढण्याचा निर्णय आघाडी आणि युतीने घेतल्याने जिल्ह्यात प्रचंड उलथापालथ झाली. आघाडी आणि युतीचे गणित शेवटच्या टप्प्यात फिस्कटल्याने रातोरात उमेदवारांची जुळवाजुळव कर ताना सर्वच पक्षांची धावपळ उडाली. यातून काही पक्षांवर उमेदवार आयात करण्याची वेळ आली, तर अनेकांना अनपेक्षितपणे उमेदवारीची लॉटरी लागली.
विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अकोला पश्चिम मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने भाजपचे विद्यमान आमदार गोवर्धन शर्मा, शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडे, कॉँग्रेसच्या नगरसेविका सौ. उषा विरक, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विजय देशमुख आणि भारिप- बहुजन महासंघाचे आसिफ खान यांचा समावेश आहे. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील आणखी काही नेत्यांचाही समावेश आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास या मतदारसंघात हिंदू, मुस्लीम, दलित मतांचे विभाजन होण्याची शक्य ता आहे. मतांचे हे विभाजन कुणाच्या पथ्यावर पडते, हे येणार्या काळातच स्पष्ट होऊ शकेल.