पोलिसांची धावपळ, नागरिकांची गर्दी
By Admin | Updated: February 2, 2016 02:14 IST2016-02-02T02:14:52+5:302016-02-02T02:14:52+5:30
सानंदा अटक प्रकरणी खामगावात दुस-या दिवशीही तणावपूर्ण शांतता.

पोलिसांची धावपळ, नागरिकांची गर्दी
खामगाव : नगर परिषदेच्या इमारत बांधकामात झालेल्या कथित अपहारप्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांना १ फेब्रुवारी रोजी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याने सकाळपासूनच माजी आमदार दिलीपकुमार सानंदा सर्मथकांनी न्यायालय परिसर तसेच शहर पोलीस ठाण्यासमोरही गर्दी केली होती. सानंदा यांना न्यायालयात नेत असताना पोलिसांनी सुरक्षेबाबत पुरेपूर काळजी घेतली. दिलीपकुमार सानंदा यांना न्यायालयात नेण्याच्या १५ मिनिटांपूर्वीपासून न्यायालयासमोरून जाणारा शहरातील मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करून या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली होती. दिलीपकुमार सानंदा यांना न्यायालयात हजर करतेवेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंतराव सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी रूपाली दरेकर यांचीही उपस्थिती होती. दिलीपकुमार सानंदा यांना न्यायालयात हजर करण्याआधी न्यायालयाच्या आवारात सकाळपासून उपस्थित असलेल्यांना बाहेर काढण्यात आले तसेच न्यायालय आवारात प्रवेशबंदी करण्यात आली. दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास पोलीस वाहनांच्या ताफ्यासोबत दिलीपकुमार सानंदा यांना न्यायालया त हजर करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या प्रचंड युक्तिवादानंतर ६.१५ वाजताच्या दरम्यान जामिनाचा निर्णय झाला. जामीन अर्जावर काय निर्णय होतो, याबाबत प्रचंड उत्सुकता लागून हो ती. त्यामुळे निकाल होईपर्यंत म्हणजेच संध्याकाळी ६.१५ वाजेपर्यंत न्यायालयासमोरील रस् त्याच्या कडेने तसेच चारही बाजूंनी दिलीपकुमार सानंदा यांचे सर्मथक, विरोधी गटाचे कार्यकर्ते तसेच नागरिकांची उपस्थिती होती. ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधकांनी नारेबाजी केली. दरम्यान, सध्या शहरात हा विषय चर्चेचा ठरत आहे. या प्रकरणात पुढे काय होते, याबाबत नागरिक तर्क-वितर्क व्यक्त करीत आहे. दुसरीकडे पोलीस प्रशासनही हे प्रकरण हाताळताना सावध पावले टाकत असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोठे निर्माण होणार नाही, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जात आहे. सोमवारी खामगावलगतच्या पोलीस ठाण्यांतील कुमक खबरदारीचा उपाय म्हणून खामगावात बोलाविण्यात आली होती. न्यायालयाच्या परिसरात दंगाकाबू पथकही तैनात करण्यात आले हो ते. जामीन अर्जावर ५ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने, पुढील निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.