सत्यपाल महाराज यांना पोलिस संरक्षण द्या!

By Admin | Updated: May 18, 2017 19:12 IST2017-05-18T19:12:10+5:302017-05-18T19:12:10+5:30

गुरुदेव सेवक, पुरोगामी संघटनांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Police patrol Satyapala Maharaj! | सत्यपाल महाराज यांना पोलिस संरक्षण द्या!

सत्यपाल महाराज यांना पोलिस संरक्षण द्या!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ज्येष्ठ प्रबोधनकार तथा सुप्रसिद्ध सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबई येथील नायगाव-दादर परिसरात प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यामुळे सत्यपाल महाराज यांच्या जीविताला धोका असल्याचे सिद्ध होत असून, त्यासाठी शासनाने त्यांना पोलिस संरक्षण द्यावे, तसेच हल्लेखोराविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अकोला येथील गुरुदेव सेवक व पुरोगामी विचारांच्या संघटनांकडून राज्याचे गृहराज्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली.
सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबईतील नायगाव-दादर परिसरात १२ मे रोजी कुणाल जाधव नामक एका माथेफिरु युवकाने जीवघेना चाकु हल्ला केला. यामध्ये सत्यपाल महाराज गंभीर जखमी झाले. कार्यकर्त्यांची समयसूचकता व वेळीच औषधोपचार मिळाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. सत्यपाल महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य अखंडीत सुरु असून, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा तसेच शाहु, फुले व आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार ते करीत आहेत. शासनाचे अनेक समाजोपयोगी उपक्रम सत्यपाल महाराज यांनी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही पोहचविले आहेत. अशा पुरोगामी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर हल्ला होणे ही चिंतनिय बाब आहे. सत्यपाल महाराज यांचे प्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. तसेच आरोपी जाधव याचा हेतू महाराजांचा खुन करण्याचा असल्यामुळे त्याच्याविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्राती गुरुदेव सेवक, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, युवा राष्ट्र परिवार, दलीतमित्र संघटना व पुरोगामी विचारांच्या इतर संघटना आंदोलन छेडतील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर रामेश्वर बरगट, अ‍ॅड. संतोष भोरे, डॉ. प्रकाश मानकर, श्रीपाद खेडकर, अविनाश नाकट, धनंजय मिश्रा, अशोक पटोकार, दिवाकर पाटील, महादेव हुरपडे, प्रशांत बुले, अभिजीत गहुकर, अतुल डोंगरे, प्रल्हादराव निखाडे, अ‍ॅड. वंदन कोहाडे, उमेश डोंगे, यांच्यासह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Police patrol Satyapala Maharaj!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.