पोलिसांची दोन युवकांना अमानुष मारहाण
By Admin | Updated: November 13, 2014 01:15 IST2014-11-13T01:15:25+5:302014-11-13T01:15:25+5:30
तेल्हार्यातील प्रकार : संतप्त नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक.

पोलिसांची दोन युवकांना अमानुष मारहाण
तेल्हारा (अकोला): येथील संत तुकाराम चौकात दुचाकीस्वार व पोलीस कर्मचारी यांच्यात वाहन लावण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादात पित्त खवळलेल्या पोलिसांनी दोघांना भरचौकात व नंतर पोलिस ठाण्यात बेदम मारहाण केली. ही घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेनंतर ठाण्यात मोठा जमाव झाला होता. पोलिसांच्या या मारहाणीत एक जण गंभीर जखमी आहे. दोघांनाही अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृत्त लिहिपर्यंत याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झाली नव्हती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथील संत तुकाराम चौकात मोटरसायकल उभी करण्यावरून खापरखेड येथील गोपाल वाघ व थार येथील गणेश फोकमारे यांची तेथे तैनात पोलिस कर्मचार्यांसोबत बाचाबाची झाली. पोलिस कर्मचारी डाबेराव यांनी दोघांना ठाण्यात येण्यास बजावले. आमचा दोष नसताना आम्ही का यावे, असे त्यांनी म्हणताच चिडलेल्या कर्मचार्याने पोलिसांना पाचारण केले. थोड्याच वेळात ठाणेदार शेख अन्वर ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. या कर्मचार्यांनी कोणतीही चौकशी व माहिती न घेता दोघांना मारहाण सुरू केली. हा प्रकार भरचौकात सुरू होता. या मारहाणीत गोपाल वाघ घटनास्थळीच गंभीर जखमी झाल्याने पोलिसांनी त्याला तडक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या मारहाणीमुळे गणेश फोकमारे याच्या छातीत तीव्र वेदना होत असल्याने त्याला अकोला येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.