संकटग्रस्त महिला, युवतींसाठी पोलिसांची हेल्पलाइन
By Admin | Updated: November 12, 2014 01:09 IST2014-11-12T01:09:50+5:302014-11-12T01:09:50+5:30
अकोला पोलिसांचा पुढाकार, १0९१ क्रमांकावर तत्परतेने मिळणार मदत.

संकटग्रस्त महिला, युवतींसाठी पोलिसांची हेल्पलाइन
नितीन गव्हाळे /अकोला
समाजात वावरताना महिला व युवतींना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होतो. काही प्रसंगी त्यांना मदत मिळत नाही. अशा संकटाच्या काळामध्ये महिला, युवती व बालिकांना तातडीने मदत मिळावी, या दृष्टिकोनातून अकोला पोलिसांनी हेल्पलाइन सुरू केली. अकोला जिल्ह्यात प्रथमच हा प्रयोग राबविला जात आहे. पुरुषी अत्याचाराच्या विळख्यात अनेक महिला, युवती अडकतात. यातून त्यांची सुटका करणे कठीण जाते. दिल्लीच्या निर्भया बलात्कार कांडामुळे देशभरामध्ये जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. केंद्र शासनानेसुद्धा महिला अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायदे केले; परंतु, त्यानंतरही महिला, युवती व बालिकांचे शोषण थांबलेले नाहीत. संकटप्रसंगी महिला, युवतींना मदतही मिळत नाही. अशावेळी त्यांची फरफट होते. त्यांना संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही. नातेवाईक, मित्रमंडळीही मदतीला धावून येत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये महिला, युवतींना मदत मिळावी, या दृष्टिकोनातून पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या संकल्पनेतून अकोला पोलिस दलाने एक हेल्पलाइन सुरू केली. हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक संकटग्रस्त महिला, युवतींना पोलिसांचा आधार, त्यांचे सहकार्य मिळणार आहे. महिला व युवतींसाठी पोलिस प्रशासनाने हेल्पलाइन सुरू केली आहे. बरेचदा १00 क्रमांक हा व्यस्त येतो. त्यामुळे महिलांना त्यावर संपर्क साधता येत नव्हता. १0९१ क्रमांकावर संपर्कसाधल्यास महिला, तरुणींना तातडीने मदत मिळेल अशी ग्वाही सहायक पोलिस अधीक्षक यांनी लोकमतशी बोलताना दिली.