पोलीस फेल, नागरिकांनीच घेतली कमान
By Admin | Updated: May 19, 2015 01:23 IST2015-05-19T01:23:02+5:302015-05-19T01:23:02+5:30
सोनसाखळी चोरास पकडले; एक फरार.
_ns.jpg)
पोलीस फेल, नागरिकांनीच घेतली कमान
अकोला - अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या असलेल्या महिलेच्या गळयातील सोनसाखळी हिसकून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या अट्टल चोरट्यास नागरिकांनी सोमवारी रात्री पकडले. या चोरट्याला खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मलकापूर परिसरातील आकृतीनगर येथील रहिवासी विजय पोरे हे अशोक वाटिका चौकातील पेट्रोल पंपवरून दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल पंपवर गर्दी असल्याने त्यांच्या पत्नी उषा पोरे या पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या होत्या. यावेळी त्यांच्या बाजूलाच उभा असलेला शेख मोहसीन शेख महबूब (रा. सोनटक्के प्लॉट) याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकून दुचाकीने पळ काढला. अशोक वाटिका चौकातील सिग्नल तोडून हा चोरटा फरार झाला; मात्र गोपाल ठाकूर व त्यांच्या काही मित्रांनी या चोरट्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पेट्रोल पंपवर आणून त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. खदान पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, रात्री उशिरा या अट्टल चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खदानचे ठाणेदार छगन इंगळे यांनी दिली. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकून फरार होणार्या चोरट्यांचे प्रमाण वाढले आहे. मॉर्निग वॉकला जाणार्या महिला किंवा घरासमोर उभ्या असलेल्या महिलांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकणे व दुचाकीने पळ काढण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. एकाही चोरट्याविरुद्ध फास आवळण्यास पोलिसांना अद्याप यश आले नाही. शेख मोहसीन शेख महबूब या अट्टल चोरट्यास नागरिकांनी पकडून त्याला खदान पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याला सोडविण्यासाठी काही राजकीय पदाधिकार्यांनी खदान पोलीस ठाणे गाठून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.