कारागृहातील ‘त्या‘ पोलीस कर्मचा-याची आत्महत्या
By Admin | Updated: March 27, 2015 01:30 IST2015-03-27T01:30:59+5:302015-03-27T01:30:59+5:30
अकोला येथे रेल्वे मार्गावर आढळला मृतदेह.

कारागृहातील ‘त्या‘ पोलीस कर्मचा-याची आत्महत्या
अकोला: शहरातील जिल्हा कारागृहात कार्यरत असलेल्या आणि मंगळवारी बेपत्ता झालेल्या एका पोलीस कर्मचार्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे मार्गावर आढळून आला. त्यामुळे बेपत्ता झालेल्या कारागृहतील त्या पोलीस कर्मचार्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची बाब समोर आली. जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचारी गोकुलसिंह राजारामसिंह चव्हाण (५0) हे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे गत काही दिवसांपासून चिंतित होते. अशातच मंगळवार, २४ मार्च रोजी सकाळी १0 वाजता आरोग्य तपासणीसाठी जात असल्याचे सांगून एमएच २८-४३0३ क्रमांकाच्या दुचाकीने ते घरून निघून गेले. त्यानंतर मात्र ते घरी परतले नसल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने बुधवारी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली होती. गुरुवारी सकाळी शहरातील डाबकी रोड पोलीस ठाणे अंतर्गत रेल्वे मार्गावर रेल्वेने कटून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतक व्यक्तीची ओळख पटविण्यात आली असून, मृतक व्यक्ती जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचारी गोकुलसिंह चव्हाण असल्याचे उघडकीस आले. यासंदर्भात डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गत मंगळवारपासून बेपत्ता झालेल्या कारागृहातील या पोलिस कर्मचार्याचा मृत्यू रेल्वेने कटून झाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होत आहे.