मनोज भिवगडे
मूर्तिजापूर : कर्जमाफी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आज, २८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील शासकीय निवासस्थानी जाण्यासाठी निघाले होते. मात्र, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतच त्यांना अडवून ताब्यात घेण्यात आले.
या शेतकरी शिष्टमंडळाने आत्महत्याग्रस्त गावांतील माती मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट देऊन त्यांच्या समस्या थेट मांडण्याचा निर्धार केला होता. चंद्रशेखर गवळी, राहुल वानखडे, सैय्यद रियाज, अरविंद तायडे, शुभम जवजाळ, निलेश गुल्हाने, प्रवीण खोत, रामदास भगत, संतोष रुद्रकार, योगेश ठाकरे, श्रीकृष्ण खोत, चेतन ठाकरे, नितीन खेडकर, सोपान तराळ, अमोल डोंगरदिवे, किरण ओळंबे, गजानन चारथळ, रमेश चींचे आणि अरविंद राठोड आदी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी आरोप केला की, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे कर्जवसुलीच्या कारवायांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. सरकारने दिलेल्या आश्वासनांवर पाणी फिरले असून, प्रशासनाकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांनी केला आहे.
पोलिसांनी अडविल्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या देत घोषणाबाजी केली. शासनाच्या दडपशाहीच्या निषेधार्थ त्यांनी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, लोकशाहीच्या चौकटीत राहून मुख्यमंत्री फडणवीस यांना थेट त्यांच्या समस्या सांगण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु ताब्यात घेऊन सरकारने आमचा लोकशाही हक्क दडपल्याचा आरोप त्यांनी केला.