चोरट्यांची गाडी पोलिसांच्या ताब्यात

By Admin | Updated: September 7, 2015 01:38 IST2015-09-07T01:38:32+5:302015-09-07T01:38:32+5:30

मेहकर येथील घटना; मालेगावनजीक चोरटा पकडला.

Police custody of the thieves | चोरट्यांची गाडी पोलिसांच्या ताब्यात

चोरट्यांची गाडी पोलिसांच्या ताब्यात

मालेगाव (जि. वाशिम): मेहकर येथून एका व्यापार्‍याची पाच लाखांची रोकड व मौल्यवान वस्तू हिसकावून मालेगावच्या दिशेने निघालेल्या एका स्कॉर्पिओ गाडीला मालेगाव पोलिसांनी मोठय़ा शिताफीने शिरपूर-मालेगावदरम्यान पकडले. या गाडीमधील चालकाला पकडण्यात आले असून, अन्य पाच ते सहा जण पळून जाण्यात यशस्वी झाली. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास मालेगाव पोलिसांनी पार पाडली. मेहकर येथील श्री गजानन महाराज मंदिर मार्गावर व्यापारी युवक साजन अशोक वाघेला यांच्याशी एम.एच. २९ ए.डी. ३४६७ क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीमधील व्यक्तींचा सोन्याचा व्यवहार ठरला होता. या गाडीमधील इसमांनी वाघेला यांच्याजवळील पाच लाख रुपयांची बॅग व अन्य साहित्य असलेली बॅग हिसकावून गाडीसह मालेगावच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेची माहिती वाघेला यांनी मेहकर पोलिसांना देताच, मेहकरचे ठाणेदार आणि बुलडाण्याचा अपर पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर यांनी मालेगाव ठाणेदार मिर्झा यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. मालेगाव पोलिसांनी मेहकर दिशेला धाव घेतली असता, डोंगरकिन्ही येथे सदर गाडी समोरून येत असल्याचे दिसले. या स्कॉर्पिओला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने भरधाव वेगात गाडी पुढे नेली. एकांबा मार्गे शिरपूर असा गाडीचा पाठलाग केला. शेवटी शिरपूरवरून मालेगावकडे भरधाव येत असताना, मालेगाव पोलिसांच्या गाडीने स्कॉर्पिओला ओव्हरटेक करून मालेगावनजीक पकडले. चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, त्याला पकडण्यात आले. देवानंद देवराव जिरे (वय ३२) रा. दिघी ता. कारंजा असे चालकाचे नाव असून, स्कॉर्पिओमधील अन्य पाच ते सात जण पिंप्री सरहद्द शेतशिवारातून पसार झाल्याची माहिती मालेगाव पोलिसांनी दिली होती.

Web Title: Police custody of the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.