हुल्लडबाजी करणा-यांना पोलीस घेणार ताब्यात
By Admin | Updated: March 5, 2015 01:59 IST2015-03-05T01:59:00+5:302015-03-05T01:59:00+5:30
रंगपंचमीला विचित्र आवाज काढणा-यांवरही कारवाई.

हुल्लडबाजी करणा-यांना पोलीस घेणार ताब्यात
अकोला: रंगपंचमीच्या पृष्ठभूमीवर शहरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये पोलीस कर्मचारी तैनात करण्यासोबतच ह्यगुड मॉर्निंगह्ण पथकही गस्त घालणार आहे. रंगपंचमीला दरवर्षी घडणारे गुन्हे लक्षात घेता, जवळपास ८00 च्यावर पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान शहरात तैनात करण्यात येणार आहेत. विशेषत: रंगपंचमीला हुल्लडबाजी करणार्या टवाळखोरांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. रस्ते, चौकात हुल्लडबाजी करणारे, मद्य प्राशन करून फिरणार्यांना पोलीस थेट ताब्यातच घेणार आहेत. होळी, रंगपंचमीला दारू, अंमली पदार्थांचे सेवन करून हाणामार्या, छेडखानी, वादाचे प्रकार घडतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बंदोबस्ताचे नियोजन केले. ५ मार्च रोजीची रंगपंचमी, ६ मार्चला धूलिवंदन आणि ८ मार्चला शिवजयंती या पृष्ठभूमीवर शहरात तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. होळी, रंगपंचमीला दारू पिऊन वाहन चालविणे, विचित्र आवाज काढणे, छेड काढणे, पाण्याचे फुगे मारणे, दंगामस्ती करणार्यांना पोलीस ताब्यात घेणार आहेत. या दरम्यान महिला व तरुणींच्या सुरक्षेकडे पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय धार्मिक स्थळांची पवित्रता राखण्यासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात येईल. ५ व ६ मार्चच्या रात्री सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार आपल्या पथकातील कर्मचार्यांसह रात्रीची गस्त घालणार आहेत.