जंतनाशक गोळय़ातून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: February 11, 2015 01:26 IST2015-02-11T01:26:32+5:302015-02-11T01:26:32+5:30
चिखली तालुक्यातील घटना; ७ विद्यार्थी अत्यवस्थ.

जंतनाशक गोळय़ातून २६ विद्यार्थ्यांना विषबाधा
चिखली (जि.बुलडाणा) : जंतनाशक गोळय़ांच्या सेवनातून चिखली तालुक्यातील २६ विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली. सोनेवाडी येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत घडलेल्या या घटनेमध्ये सात विद्यार्थी अत्यवस्थ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मंगळवारी जिलतील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्यात आले. सोनेवाडी जिल्हा परिषद शाळेत दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास पंधरा वर्षांच्या आतील मुलांना जंतनाशक गोळ्यांचे वितरण करण्यात आले. या गोळय़ांचे सेवन केल्यानंतर, काही वेळातच काही विद्यार्थ्यांना पोट दुखणे, मळमळ व उलट्याचा त्रास सुरू झाला. या घटनेची माहिती मिळताच शिक्षक, तथा पालकांनी धावपळ सुरू केली. विद्यार्थ्यांना तत्काळ चिखली येथील ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारानंतर १९ विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली. परंतु अश्वीनी गजानन पवार (१३), हर्षल प्रल्हाद पवार (११), प्रतीक दगडू पांचाळ (८), सितल मुरलीधर जाधव (१३), शिवाजी सुभाष सोनोने (१२) सुनिता राजू राखोंडे (१३) व सिमा रमेश कर्हाडे या सात विद्यार्थ्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.
*आरोग्य कर्मचार्यांची कार्यक्रमाला दांडी
सातगाव भुसारी येथील प्राथमिक उपकेंद्राअंतर्गत सोनेवाडी येथील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे मंगळवारी वाटप करण्यात आले. यावेळी उपकेंद्रातील आरोग्य विभागाशी संबंधित एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. विद्यार्थ्यांंना जंतनाशकाच्या गोळ्या देण्यासारख्या महत्वाच्या कार्यक्रमालाही या विभागाच्या कर्मचार्यांनी दांडी मारली.