बलात्कारामुळेच विष घेतले!

By Admin | Updated: July 20, 2014 02:00 IST2014-07-20T01:59:11+5:302014-07-20T02:00:06+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; विष प्राशनाच्या घटनेला नवीन वळण, मृत्यूपूर्व जबाबात मुलीचा खुलासा

Poisoned by rape! | बलात्कारामुळेच विष घेतले!

बलात्कारामुळेच विष घेतले!

जउळका रेल्वे : स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कवरदरी येथील दोन अल्पवयीन मुलीच्या विष प्राशन प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आमच्यावर झालेल्या बलात्कारामुळेच आम्ही विष प्राषण केल्याची कबुली यापैकी एका मुलीने मृत्यूपूर्व जबाबात दिली आहे. मुलीच्या बयाणावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून एका आरोपीस अटक केली आहे. तर या प्रकरणातील एक मुलगी वाशिम येथील क्रिटीकल केअरमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

कवरदरी येथील दोन अल्पवयीन मुलींनी १५ जुलै रोजी विष प्राषण केले होते. सदर दोन्ही मुली सख्ख्या चुलत बहिणी असून कवदरीच्या शिवारात ही घटना घडली होती. ही घटना लक्षात येताच त्यांना उपचारासाठी वाशिमला हलविण्यात आले होते. उपचारादरम्यानच यातील एका मुलीची प्राणज्योत मालविली. तिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. तर दुसर्‍या अल्पवयीन मुलीवर वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. दिवसागणिक प्रकृती ढासळत असल्यामुळे नंतर तिला वाशिमच्या क्रिटिकल केअरमध्ये हलविण्यात आले होते. १९ जुलैला पोलिसांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला. या जबाबातून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला असून, प्रकरणानेही नवे वळण घेतले आहे. आम्ही शेतात गेल्यानंतर आमच्यावर गावातीलच दोन मुलांनी बलात्कार केला. त्यामुळेच आम्ही आत्महत्या करण्याच्या इराद्याने विष प्राषण केले. मुलीने दिलेल्या या जबाबामुळे सर्वांंनाच धक्का बसला आहे. तिच्या या खळबळजनक मृत्यूपूर्व जबाबावरून जऊळका पोलिसांनी कवरदरी येथीलच दोन मुलांवर भादंविच्या कलम ३७६ (ड), सह कलम ४, ६ बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम २0१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोघांपैकी एक अल्पवयीन, तर एक सज्ञान आहे. सज्ञान असलेल्या सतीष पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. क्रिटिकल केअरमध्ये उपचार घेत असलेल्या दुसर्‍या मुलीची प्रकृती चिंताजनकच आहे. तिचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार मानलवी, सहकारी जमादार अष्टोनकर व त्यांचे सहकारी करीत आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

मुलीच्या मृत्यूपूर्व बयाणानंतर पोलिसांनी त्या मुलींवर अत्याचार करणार्‍या दोन्ही युवकांना ताब्यात घेतले होते. त्यातील सतीष पांडे याला सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली आहे. अतिप्रसंग करणारा दुसरा आरोपी हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांसमोर गुंता निर्माण झाला आहे.

Web Title: Poisoned by rape!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.