न्युमोकोकल लस रोखणार बालमृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST2021-07-10T04:13:57+5:302021-07-10T04:13:57+5:30
बॅक्टेरियल न्युमोनिया हा आजार प्रामुख्याने वयोवृद्धांसोबतच बालकांमध्येही आढळतो. हीप न्युमोनिया आणि बॅक्टेरिअयल न्युमोनियामुळे साधारणत: अर्भक आणि बालमृत्यू होतात. बालकांमधील ...

न्युमोकोकल लस रोखणार बालमृत्यू!
बॅक्टेरियल न्युमोनिया हा आजार प्रामुख्याने वयोवृद्धांसोबतच बालकांमध्येही आढळतो. हीप न्युमोनिया आणि बॅक्टेरिअयल न्युमोनियामुळे साधारणत: अर्भक आणि बालमृत्यू होतात. बालकांमधील मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी राज्यभरात बालकांमधील लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी न्युमोकोकल ही लस प्रभावी ठरत आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत दीड महिन्याच्या नवजात शिशूला पहिला डोस दिला जाणार आहे. त्यानंतर साडेतीन महिन्यांनंतर दुसरा आणि ९ महिन्यांनंतर तिसरा बुस्टर डोस दिला जाणार आहे. हा तिसरा डोस गोवर लसीसोबतच दिला जाणार आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत आरोग्य विभागाच्या अकोला मंडळासाठी पंधरा दिवसांपूर्वीच ‘न्युमोकोकल’ लसीचे १२ हजार ६०० डोस प्राप्त झाले आहेत. यापैकी १६०० डोस हे अकोला जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत.
काय आहे बॅक्टेरियल न्युमोनिया?
बॅक्टेरियल न्युमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुफ्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. परिणामी श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता असते. खोकला, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल, तर मुलांना खाण्या-पिण्यास अडचण येऊ शकते. फीट येऊ शकते. मूल बेशुद्ध होणे, तसेच त्यात त्याचा मृत्यू होण्याचाही धोका असतो.
सात टप्प्यात होणार लसीकरण
बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ० ते ६ वर्षे वयोगटादरम्यान एकूण सात टप्प्यात विविध आजारांपासून संरक्षणासाठी लसीकरण करण्यात येते. जन्मत: सहा आठवड्यांनंतर, दहा आठवडे, १४ आठवडे, नऊ महिने पूर्ण झाले की, १६ ते २४ महिन्यांदरम्यान आणि ५ ते ५ वर्षांदरम्यान, अशा टप्प्यात हे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
न्युमोकोकल लसीकरणाच्या अनुषंगाने तालुकास्तरावर आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. आठवडाभरात या लसीकरणास सुरुवात होणार आहे.
- डॉ. मनिष शर्मा, जिल्हा समन्वयक, लसीकरण, अकोला