युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट
By Admin | Updated: May 25, 2017 20:17 IST2017-05-25T20:16:59+5:302017-05-25T20:17:15+5:30
तेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात.

युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकरी ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनामध्ये माल विक्रीकरिता आणतात. वाहनांमधून येणाऱ्या धान्याचे मोजमाप स्वयंचलित भुईकाट्यावर केले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भुईकाट्यावर मोजमाप केलेल्या मालामधून प्रतिक्विंटल अर्धाकिलो लेस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून कापल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांकरवी शेतकऱ्यांची आर्थिक लूट मार्केटमध्ये सुरू होती. साधारणपणे एक ट्राली तुरीमध्ये एक हजार रुपये हरभऱ्याच्या ट्रालीमागे बाराशे रुपये तर सोयाबीनच्या ट्रालीमागे पाचशे रुपयाचे आर्थिक नुकसान या लेसमुळे शेतकऱ्यांना सहन करावे लागत असे. म्हणजे वर्षाकाळी लाखो रुपयाचे नुकसान बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे होत राहिले आहे. बाजार समितीमध्ये निवडून येणारे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत असले तरी या अन्यायाबद्दल एकाही संचालकाने याबद्दल आजपर्यंत एक चकार शब्दही काढला नाही, हे विशेष.
युवाशक्ती संघटनेचे खापरखेड येथील जागरूक कार्यकर्ते व शेतकरी नारायण नामदेव भोकरे यांनी त्यांच्याकडील ासेयाबीन बाजार समितीमध्ये विक्रीस आणून महेश ट्रेडिंग कंपनीमार्फत विकले. त्यंच्या मालाच्या काटापट्टीतून प्रतिक्विंटल अर्धा किलो लेस संबंधित व्यापाऱ्याने कापल्यानंतर त्यांनी बाजार समितीकडे रितसर तक्रार दाखल करून बाजार समितीला धारेवर धरले. अखेर बाजार समितीला यावर योग्य पाऊल उचलने भाग पडले. यामुहे बाजार समितीने लेस घेण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढून संबंधित व्यापाऱ्यावर नोटीसे बजावल्या. बाजार समितीला लेसला प्रतिबंधक करणारा फलक बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा लागला. नारायण भोकरे यांच्या जागरुकतेमुळे शेतकऱ्यांचे वर्षाकाठी लाखो रुपयाचे नुकसान थांबले आहे. नारायण भोकरे यांचे जागरुकतेबद्दल युवाशक्ती संघटनेचे भवानीप्रताप, उत्तम नळकांडे, विजय बोर्डे व वैभव पोटे यांनी त्यांचे कौतुक केले असून कुठल्याही व्यापाऱ्याने काटापट्टीतून लेस कापल्यास बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.