शेगावातील युवकांकडून पिस्तूल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 02:03 IST2016-02-02T02:03:05+5:302016-02-02T02:03:05+5:30
दोन्ही युवक गजाआड; डझनावर पिस्तूल जप्त.

शेगावातील युवकांकडून पिस्तूल जप्त
अकोला : शेगाववरून अकोल्यात पिस्तूल घेऊन येणार्या दोन युवकांना आकोटफैल पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली.
शेगाव येथील ताडी परिसरातील अमोलसिंह रामसिंह राजपुत (३२) व पंचशील नगरमधील रहिवासी तानाजी महादेवराव चव्हाण (४१) हे दोघे एमएच २८-एके -६३२४ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्यात पिस्तूल घेउन येत असल्याची माहिती आकोटफैल पोलिसांना मिळाली. या माहितीवरून आकोटफैल पोलिसांनी आपातापा चौकामध्ये पाळत ठेवली. रविवारी रात्री उशीरा दुचाकीवर दोघे येताच आकोटफैल पोलिसांनी त्यांची झडती घेतली. यामध्ये या दोघांजवळ २0 हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आढळली. या दोघांविरुध्द आकोटफैल पोलिसांनी आर्म्स अँक्टचे कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या दोन्ही आरोपींना सोमवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी स्वरुपकुमार बोस यांच्या न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीतर्फे अँड. केशव एच. गीरी व वैशाली गीरी यांनी कामकाज पाहीले. गत महिन्यातच शेगाव येथील रहिवासी राहुल शिवाजी शिरसाट व सुदर्शन उर्फ गोलू गोपाल उकर्डे या दोघांना आकोटफैल पोलिसांनी एक पिस्तूल व चार काडतूस घेउन येत असताना अटक केली होती.
जवळपास २ वर्षात अकोल्यात डझनावर पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच २0 जिवंत काडतूसही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावरून जिल्हयात पिस्तूल-खरेदी विक्रीची मोठी उलाढाल सुरु असल्याचे स्पष्ट होत असून हे रॅकेट आकोटफैलमधून चालविण्यात येत असल्याचेही मागील दोन कारवाईवरून उघड झाले आहे.