लसीकरणासाठी होतेय पायपीट; नागरिकांचे हाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:18 IST2021-05-08T04:18:35+5:302021-05-08T04:18:35+5:30
पातूर तालुक्यात केवळ पाच केंद्रांतच लसीकरण सुरू संतोषकुमार गवई पातूर : तालुक्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात ...

लसीकरणासाठी होतेय पायपीट; नागरिकांचे हाल!
पातूर तालुक्यात केवळ पाच केंद्रांतच लसीकरण सुरू
संतोषकुमार गवई
पातूर : तालुक्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात केवळ पाच केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याने नागरिकांना तेथे जाऊन लस घ्यावी लागत आहे. लॉकडाऊनमुळे दळणवळणाची साधने बंद असल्याने लसीकरण केंद्राच्या परिसरातील नागरिकांना ४५ अंश तापमानात लसीकरणासाठी पायपीट करावी लागत आहे. काही नागरिकांना लसीकरण केंद्रात जाऊन तसेच परतावे लागत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला फ्रन्टलाइन वर्कर, त्यानंतर दुर्धर आजारग्रस्त व वृद्धांना लस देण्यात येत होती. सद्य:स्थितीत १८ वर्षांवरील वयोगटातील सर्वांना लस देण्यात येत असल्याने लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. तालुक्यात सुरुवातीला १६ लसीकरण केंद्रांत लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने आता केवळ पाच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. ११ लसीकरण केंद्र बंद अवस्थेत आहेत. लसीकरण केंद्र घरापासून दूर असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे दळणवळणाची सुविधा नसल्याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी होत आहे.
---------------------------
लसीकरण केंद्रात पोहोचेपर्यंत लस संपते!
तालुक्यातील बाभूळगाव, पातूर, आलेगाव, सस्ती व मळसूर या आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. लसीकरण केंद्राच्या परिसरातील नागरिकांना लस घेण्यासाठी १० ते १२ कि.मी. पायपीट करावी लागते. काही वेळा लाभार्थी लस घेण्यासाठी केंद्राकडे निघतो, मात्र लसीकरण केंद्रात पोहोचेपर्यंत लस संपत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
----------------------------------------
तालुक्यातील ११ लसीकरण केंद्र बंद!
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. सुरुवातीला तालुक्यातील १६ केंद्रांमध्ये लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती; मात्र सद्य:स्थितीत केवळ ५ लसीकरण केंद्रातच मोहीम सुरू असून, इतर ११ लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हे लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे.