पिके करपली; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:23+5:302021-07-07T04:24:23+5:30

अकोला : पावसाने दांडी मारल्याने शेतात उगवलेली पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आधीच ...

Pike Karpali; Crisis of double sowing, farmers worried! | पिके करपली; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल!

पिके करपली; दुबार पेरणीचे संकट, शेतकरी हवालदिल!

अकोला : पावसाने दांडी मारल्याने शेतात उगवलेली पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाकाळात आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतीची कामे ठप्प असल्याने, शेतमजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याचे दुर्भिक्ष जिल्ह्यातील खारपानपट्ट्यातील ‘बारुला’ विभागात मंगळवारी समोर आले. जिल्ह्यातील इतरही भागांत असेच चित्र असल्याचे वास्तव आहे.

खरीप हंगामातील जवळपास ८० टक्के पेरण्या आटोपल्या असून, पेरणीनंतर मात्र पावसाने दांडी मारली आहे. गेल्या बारा, तेरा दिवसांपासून पाऊस नसल्याने, शेतात पेरलेले बियाणे काही ठिकाणी उगवले तर काही उगवले नाही. पावसाचा पत्ता नाही आणि तापत्या उन्हासोबतच प्रचंड उकाडा जाणवत असल्याने शेतात उगवलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकांची वाढ खुंटली असून, पावसाअभावी अनेक शेतांत पिके करपली आहेत. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च बुडाला असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनाकाळात आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हातातील पैसा पेरणीसाठी खर्च झाला असून, पिके करपल्याने दुबार पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पावसाने दांडी मारल्याच्या स्थितीत शेतीची कामे ठप्प झाली असून, काही शेतकऱ्यांनी अद्यापही खरीप पेरणी केली नसून, हजारो रुपयांचे खरेदी केलेले बियाणे शेतकऱ्यांच्या घरातच पडून असल्याचे वास्तव आहे.

‘या’ गाव शिवारांत

असे आढळले वास्तव!

अकोला तालुक्यात बारुला विभागात घुसरवाडी, म्हातोडी, लाखोंडा, आपातापा, आखतवाडा, अनकवाडी, घुसर व खरप इत्यादी गाव शिवारांत बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली असून, पावसाने दांडी मारल्याने काही ठिकाणी पिके उगवली तर काही ठिकाणी पिके उगवली नाही. उगवलेली पिकेदेखील पावसाअभावी करपली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरला नाही. यासोबतच पावसाने दांडी मारल्याने शेतीची कामे बंद असल्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याची स्थिती आहे.

२० एकरातील कपाशी करपली;

१.१५ लाख रुपयांचा खर्च बुडाला!

२० एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पेरणीनंतर १२ दिवसांचा कालावधी उलटून गेला. मात्र, पावसाने दांडी मारल्याने शेतात काही ठिकाणी बियाणे उगवले असून, काही ठिकाणी बियाणे उगवले नाही. उगवलेले कपाशीचे पीक करपले आहे. आता दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कपाशीचे बियाणे, पेरणी, खत आणि मशागतीसाठी केलेला १ लाख १५ हजार रुपयांचा खर्च बुडाला आहे. अशी व्यथा घुसर येथील शेतकरी चंदू खडसे यांनी मांडली.

.....................फोटो.................

शेतकऱ्यांच्या अशा आहेत व्यथा............

१४ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. कर्ज काढून बियाणे, पेरणी व मशागतीचा खर्च केला. मात्र, पेरणीनंतर पाऊस नसल्याने उगवलेले कपाशीचे पीक करपण्याच्या मार्गावर असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे; परंतु दुबार पेरणीचा खर्च आता कसा भागविणार, याची चिंता सतावत असून, दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली पाहिजे.

-रामेश्वर बेहरे,

शेतकरी, घुसर.

.....................फोटो......................

चार एकर शेतात कपाशीची पेरणी केली. त्यानंतर पाऊस नसल्याने काही ठिकाणी पीक उगवले नाही, तर उगवलेले कपाशीचे पीक करपले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार असून, या दुबार पेरणीचा खर्च भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

छंदक शिरसाट,

शेतकरी, म्हातोडी.

..................फोटो.................

सहा एकर शेतात मूग व आठ एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पाऊस नसल्याने उगवलेले मुगाचे पीक कोमेजण्याच्या मार्गावर असून, आठ एकर शेतात पेरलेले कपाशीचे पीक कुठे उगवले तर कुठे उगवलेच नाही. उगवलेले पीकदेखील करपले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागणार असून, दोन्ही पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च बुडणार आहे.

गजानन भांडे,

शेतकरी, लाखोंडा.

.........................फोटो..........................

पाच एकरात कपाशीची पेरणी केली. त्यापैकी उगवलेले पीक कोमेजल्याने दुबार पेरणी करावी लागणार आहे. पेरणीसाठी केलेला खर्च व्यर्थ जाणार असून, दुबार पेरणीचा खर्च कसा भागविणार, याबाबतची आता चिंता आहे.

रवी घोडे,

शेतकरी, आपातापा.

........................फोटो..................................

पेरणीनंतर पाऊस नसल्याने शेतातील सोयाबीन व कपाशीचे पीक करपले आहे. या पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च बुडाला असून, दुबार पेरणी करावी लागणार आहे. मात्र, दुबार पेरणीचा खर्च कसा करायचा, याबाबतची चिंता असून, पाऊस आला आणि पैसे हातात असले तर पेरणी करणार अन्यथा दुबार पेरणी करणे शक्य होणार नाही.

गजानन दुर्गे,

शेतकरी, आखतवाडा.

................फोटो.............................

पाच एकर शेतातील कपाशी, तसेच चार एकर शेतात सोयाबीन, तूर व मूग पेरणी केल्यानंतर पावसाने दांडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली असून, पिके करपली असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. हातातील पैसा पेरणीसाठी खर्च झाला असून, आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याबाबतची चिंता आहे. यासोबतच शेतमजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शासनाने दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मदत द्यावी तसेच शेतमजुरांसाठी रोहयो अंतर्गत कामे सुरू करण्याची गरज आहे.

दिलीप मोहोड,

सरपंच तथा शेतकरी, आखतवाडा.

..........................फोटो.......................

जीवन जगावं तरी कसं;

कोरोनापेक्षा कठीण परिस्थिती !

दहा दिवसांपूर्वी दोन एकर शेतात मूग, दोन एकर शेतात सोयाबीन व चार एकर शेतात कपाशीची पेरणी केली. पीक उगवले; परंतु पाऊस नसल्याने पिके करपली असून, दुबार पेरणीचे संकट आहे. मात्र, पेरलेल्या पिकांवर जवळचा पैसा खर्च झाल्याने आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याची चिंता आहे. त्यामुळे जीवन जगावं तरी कसं, कोरोनापेक्षा आमची परिस्थिती कठीण आहे, अशी व्यथा अनकवाडी येथील शेतकरी नीळकंठ थोरात यांनी व्यक्त केली. पीक नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दुबार पेरणीसाठी मदत दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

...................फोटो......................

पावसाची वाट; बियाणे घरातच!

नऊ एकर शेतात पेरणीसाठी कपाशी, सोयाबीन बियाणे घेतले. मात्र, पाऊस नसल्याने पेरणी केली नाही. त्यामुळे घेतलेले बियाणे घरातच पडून आहे. पावसाची वाट असून, पेरणीलायक पाऊस झाल्यानंतर पेरणी करणार आहे. आठ दिवसांत पाऊस आला नाही तर पेरणी साधणार नसून, रबी हंगामात हरभरा पिकाची पेरणी करावी लागणार आहे, असे घुसर येथील शेतकरी शेषराव तिडके यांनी सांगितले. तसेच पाऊस नसल्याने सात एकर शेतात अद्याप पेरणी केली नसल्याचे घुसर येथील शेतकरी चंद्रमणी गोपनायण यांनी सांगितले.

......................फोटो............................

Web Title: Pike Karpali; Crisis of double sowing, farmers worried!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.