डुकरांना अज्ञात आजाराची लागण; मृत्यूचे प्रमाण वाढले
By Admin | Updated: February 24, 2015 01:22 IST2015-02-24T01:22:31+5:302015-02-24T01:22:31+5:30
तीन दिवसांत डुकरे अकोल्याबाहेर काढा; आयुक्तांचे निर्देश.

डुकरांना अज्ञात आजाराची लागण; मृत्यूचे प्रमाण वाढले
अकोला : अज्ञात आजाराच्या साथीने शहराच्या विविध भागांमध्ये डुकरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, प्रभाग क्र.५ मध्ये एकाच दिवशी पाच डुकरे मरण पावली. स्वाइन फ्लूचा प्रसार डुकरांमुळे होत असल्याची शक्यता लक्षात घेता, महापालिका आयुक्त सोमनाथ शेटे यांनी वराहपालकांना तीन दिवसांत त्यांच्याकडील डुकरे शहराबाहेर काढण्याचा आदेश सोमवारी दिला. तीन दिवसांनंतर वराह आढळल्यास संबंधित पशुपालकाविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. महिनाभरापासून शहराच्या विविध भागांत मोकाट कुत्री व डुकरांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मनपा विरोधी पक्षनेता साजिद खान, भाजप नगरसेवक बाळ टाले यांच्या प्रभागात अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडणार्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली, तर भाजप नगरसेविका गीतांजली शेगोकार यांच्या प्रभागात पाच डुकरांचा अचानक मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिनाभरापूर्वी प्रभाग क्र. २५ मध्येसुद्धा चार डुकरांचा मृत्यू झाला होता. राज्यात स्वाइन फ्लूची लागण होणार्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सवरेपचार रुग्णालयात अमरावती, वाशिम व बुलडाणा येथील स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. डुकरांमुळे स्वाइन फ्लूचा प्रसार वाढतो, या शक्यतेने मनपा प्रशासन सजग झाले असून, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मृत डुकरांचे शवविच्छेदन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील वराहपालकांना तीन दिवसांच्या आत त्यांच्याकडील डुकरे शहराबाहेर काढण्याचे आदेश दिले.
*तात्काळ बैठक
जीवघेण्या स्वाइन फ्लूची शक्यता व मोकाट कुत्री, डुकरांचे होणारे मृत्यू लक्षात घेता, आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवारी स्वच्छता व आरोग्य विभागाची तात्काळ बैठक बोलावली. स्वच्छतेच्या मुद्दय़ावर हलगर्जी खपवून घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.