लढतींचे चित्र स्पष्ट!
By Admin | Updated: October 2, 2014 02:01 IST2014-10-02T02:01:39+5:302014-10-02T02:01:39+5:30
अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघात पंचरंगी लढत.

लढतींचे चित्र स्पष्ट!
अकोला: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले असून, आता जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात पंचरंगी लढतीची धुमशान सुरू झाली आहे. जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार रिंगणात आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर, जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाचही मतदारसंघात एकूण ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले. निवडणूक रिंगणातील या उमेदवारांमध्ये विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी दुभंगल्याच्या स्थितीत होत असलेल्या या विधानसभा निवडणुकीत यावेळी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात प्रामुख्याने पंचरंगी लढत रंगणार आहे. त्यानुषंगाने निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे.
** ६६ उमेदवारांची माघार
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, बुधवारी जिल्ह्यातील पाच मतदारसंघात एकूण ६६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, पाच मतदारसंघात ९३ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील ६६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामध्ये विविध राजकीय पक्षांच्या काही दिग्गज उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. एकूण १५९ उमेदवारांपैकी ६६ उमेदवारांनी माघार घेतल्याने पाच मतदारसंघात ९३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक आहेत.