मनपाच्या पथकावर पुन्हा दगडफेक
By Admin | Updated: May 8, 2015 01:47 IST2015-05-08T01:47:43+5:302015-05-08T01:47:43+5:30
नाला सफाईचे काम थांबवले.

मनपाच्या पथकावर पुन्हा दगडफेक
अकोला : माळीपुरास्थित श्रीराम ट्रान्सपोर्ट परिसरात नागरिकांच्या तक्रारीवरून नाला सफाईसाठी गेलेल्या मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकावर पुन्हा दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी घडली. दगडफेकीत जेसीबी वाहनाचे काच फुटले. या प्रकारामुळे मनपाला नाला सफाईचे काम अध्र्यावरच थांबवावे लागले. माळीपुरा परिसरात मोठय़ा प्रमाणात जड वाहतूक होते. श्रीराम ट्रान्सपोर्ट परिसरातील नागरिकांच्या तक्रारीवरून उपायुक्त माधुरी मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली नाला सफाईचे काम सुरू करण्यात आले. अतिक्रमण विभागाने नाला सफाईला सुरुवात करताच काही अज्ञात इसमांनी अचानक जेसीबी वाहनावर दगडफेक केली. यामुळे वाहनाच्या काचा फुटल्या. हा प्रकार लक्षात घेता, सहाय्यक नगररचनाकार संदीप गावंडे, कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, अतिक्रमण विभाग प्रमुख विष्णू डोंगरे व कर्मचार्यांनी काम थांबवले. सुदैवाने यावेळी कोणीही जखमी झाले नाही.