पेट्रोल पंप बंदच्या आंदोलनाचा निर्णय आजच्या बैठकीवर!
By Admin | Updated: June 13, 2017 00:56 IST2017-06-13T00:56:32+5:302017-06-13T00:56:32+5:30
आॅइल कंपनीनेही बोलाविली बैठक : पेट्रोल पंपावर झाली गर्दी

पेट्रोल पंप बंदच्या आंदोलनाचा निर्णय आजच्या बैठकीवर!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : देशभरातील पेट्रोल-डीझेलचे दर येत्या १६ जूनपासून दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनातर्फे घेतल्या जात असून, त्याला विरोध करण्यासाठी देशभरातील पेट्रोल पंप असोसिएशनचे पदाधिकारी यांनी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाबाबत मंगळवार, १३ जून रोजी बैठक होणार असून, त्यात अंतिम निर्णय होईल. दरम्यान, यासंदर्भात आॅइल कंपनीनेदेखील बैठक बोलविली आहे. पेट्रोल पंप संचालक आंदोलनाची भाषा बोलू लागल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आहे.
इंधनाच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण व्हावी, दरातील चढ-उताराचा फटका ग्राहकाला बसू नये, या उद्देशाने पेट्रोल-डीझेलचे भाव दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या पेट्रोलियम मंत्रालयाच्यावतीने घेतला जात आहे. १६ पासून हा निर्णय लागू करण्यात येऊ नये, याविरुद्ध येत्या १६ ते २४ जूनपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय फेडरेशन आॅफ आॅल इंडिया पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने जाहीर केला आहे; मात्र अजूनही या आंदोलनासंदर्भात शिक्कामोर्तब झालेले नाही. १३ जून रोजी आता मुंबईत यासंदर्भात बैठक होणार असून, त्यात आंदोलनाची दिशा ठरणार आहे.