पेट्रोलपंप धारकांना सव्वातीन लाखांचा फटका!
By Admin | Updated: June 17, 2017 01:31 IST2017-06-17T01:31:15+5:302017-06-17T01:31:15+5:30
पेट्रोल-डीझल दरबदलाचा परिणाम : पहिल्याच दिवशी नुकसानलोकमत न्यूज नेटवर्क

पेट्रोलपंप धारकांना सव्वातीन लाखांचा फटका!
अकोला: पेट्रोल-डीझलचे दर दररोज बदलण्याचा फटका अकोल्यात पहिल्याच दिवशी बसला. ज्या दराने अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांनी पेट्रोलची खरेदी केली होती, त्यापेक्षा स्वस्त दरात १६ जून रोजी पेट्रोलची विक्री करावी लागली. त्यामुळे अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांना सव्वातीन लाखांचे नुकसान पहिल्याच दिवशी सहन करावे लागले. हे नुकसान पेट्रोलपंप संचालक आॅइल कंपनीच्या माथी मारणार आहेत.
गुरुवारी रात्री पेट्रोल-डीझलचे भाव जाहीर झाले. ज्या भावात अकोल्यातील पेट्रोलपंप संचालकांनी खरेदी केली होती, त्यापेक्षा दीड रुपया कमी दर जाहीर झाले. अकोला जिल्ह्यात एकूण ६३ पेट्रोलपंप आहेत. एका पेट्रोलपंप संचालकांस पहिल्याच दिवशी किमान पाच हजाराचा फटका बसला. पाच हजाराच्या हिशेबाने पहिल्या दिवशीचे पेट्रोलपंप संचालकांचे नुकसान सव्वातीन लाखांच्या घरात गेले.
देशभरातील पेट्रोल-डीझलचे दर येत्या १६ जूनपासून दररोज बदलण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. दर वाढले तर पेट्रोलपंप संचालकांना फायदा आणि दर घसरले तर तोटा यावर आॅइल कंपनी आणि पेट्रोलपंपाचे आर्थिक चक्र यापुढे चालणार आहे. चढ्या भावाने खरेदी केली आणि भाव घसरले तर त्याचा तोटा यापुढे आॅइल कंपनीला सोसावा लागणार आहे. पेट्रोलचे दर रात्रीच जाहीर होत असले तरी त्याची अंमलबजावणी दुसऱ्या दिवशी सकाळी सहापासून केली जाणार आहे. जे पेट्रोलपंप आॅटोमेशन नाही त्या पेट्रोल पंपावर मॅन्युअली दर टाकावे लागत आहे.
अकोला शहरातील सहा आणि इतर जिल्ह्यातील असे एकूण ३२ पेट्रोल पंपांचे अजूनही आॅटोमेशन झालेले नाही. तिन्ही आॅइल कंपनीने पेट्रोलपंपाचे आॅटोमेशन करून देण्याचे सांगितले असले तरी अजूनही या प्रक्रियेला सहा ते आठ महिने लागणार आहे.
पेट्रोल असूनही जर कुणी पेट्रोलपंप संचालक विक्री बंद ठेवत असेल तर त्याच्यावर ५० हजार ते १ लाख रुपये दंडात्मक कारवाई होईल. जर तक्रार केली गेली तर परवाना रद्दच्या कारवाईचादेखील यामध्ये समावेश आहे.
तसेच पुरवठा अधिकारी कधीही कोणत्याही वेळी पेट्रोल पंपांना आकस्मिक भेट देऊन पाहणी करतील.