लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न!

By Admin | Updated: April 26, 2017 02:12 IST2017-04-26T02:12:09+5:302017-04-26T02:12:09+5:30

आस्तिककुमार पांडेय यांची ग्वाही : जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली!

People-oriented-transparent administration effort! | लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न!

लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न!

अकोला : जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात गतिमान, लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली.
मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या शासनामार्फत गत शनिवारी करण्यात आल्या. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून जळगाव खान्देशचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पांडेय मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाले. मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडून आस्तिककुमार पांडे यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. विकासाच्या दृष्टीने अकोला जिल्ह्याचा लौकिक आणि वैभवात भर टाकण्याच्या कामाला प्राधान्य दिले जाईल, असेही जिल्हाधिकारी पांडेय यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी, त्यानंतर १४ जानेवारी २०१५ पासून जळगाव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्वागत केले.

जी. श्रीकांत कार्यमुक्त; अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिला निरोप!
नांदेड येथे बदली झाल्याने मावळते जिल्हाधिकारी जी.श्रीकांत मंगळवारी अकोला येथून कार्यमुक्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनस्थित छत्रपती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा प्रशासनामार्फत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने जी.श्रीकांत यांना निरोप देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, नवे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे, मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात जी.श्रीकांत यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

जी. श्रीकांत यांच्या उपक्रमांना ऊर्जा देणार- पांडेय
जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जी.श्रीकांत यांना जिल्हावासीयांचे जसे प्रेम मिळाले, तसेच प्रेम आणि सहकार्य मला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू करण्यात आलेले उपक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, सकारात्मक दृष्टीने या उपक्रमांना नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी स्पष्ट केले.

अकोलेकरांचे प्रेम विसरणार नाही - जी. श्रीकांत
जिल्हाधिकारी म्हणून काम करताना गत दोन वर्षांच्या कालावधीत अकोला जिल्हावासीयांनी दिलेले प्रेम विसरता येणार नाही. मला जे जिल्हावासीयांचे प्रेम मिळाले, त्यापेक्षा दुपटीने नवे जिल्हाधिकारी पांडेय यांना जिल्हावासीयांचे प्रेम मिळेल, प्रशासन अधिकाधिक गतिमान आणि लोकाभिमुख होईल, अशी अपेक्षा मावळते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: People-oriented-transparent administration effort!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.