वीज ग्राहकांनी पाच दिवसांत केला १५ कोटींचा भरणा

By Admin | Updated: November 18, 2016 03:06 IST2016-11-18T03:06:37+5:302016-11-18T03:06:37+5:30

अकोला परिमंडळाने स्वीकारल्या जुन्या नोटा.

Payment of 15 crores to electricity consumers in five days | वीज ग्राहकांनी पाच दिवसांत केला १५ कोटींचा भरणा

वीज ग्राहकांनी पाच दिवसांत केला १५ कोटींचा भरणा

अकोला, दि. १७- काळय़ा पैशाला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होत असली, तरी वीज देयक भरण्यासाठी मात्र महावितरणकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. या निर्णयाचा फायदा घेत नागरिक मोठय़ा संख्येने जुन्या नोटांद्वारे वीज देयक भरत असून, गत पाच दिवसांत महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी तब्बल १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपयांचा भरणा केल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वांंचीच मोठी गोची झाली. त्यात महावितरणनेही जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याचे परिपत्रक ९ नोव्हेंबर रोजी काढले होते. १0 नोव्हेंबर रोजी मात्र यामध्ये सुधारणा करण्यात आली. वीज देयक भरण्यासाठी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने महावितरणच्या अकोला परिमंडळात मोडणार्‍या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी अधिकृत देयक केंद्रांवर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी परिमंडळात ३ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा झाला. सुरुवातीला जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंंत ठेवण्यात आली. त्यानंतर मात्र ही मुदत २४ नोव्हेंबरपर्यंंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवार, ११ नोव्हेंबर ते गुरुवार, १६ नोव्हेंबर या कालावधीत तिन्ही जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपयांचा भरणा केला.

नोटाबंदीचा असाही फायदा
चलनातून हजार व पाचशेच्या नोटा रद्द झाल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असला, तरी या निर्णयाचा महावितरणला चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. एरवी वीज देयक भरण्याबाबत फारसे उत्सुक नसलेले ग्राहक जुन्या नोटांद्वारे वीज देयक स्वीकारले जात असल्यामुळे ते भरण्याबाबत कमालीचे उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने का होईना जुन्या नोटांचा योग्य विनियोग होत असल्यामुळे त्याचा फायदा महावितरणाला होताना दिसत आहे.

जिल्हानिहाय असा झाला भरणा
जिल्हा                देयक भरणा
अकोला               ६ कोटी ५९ लाख ८२ हजार
बुलडाणा              ६ कोटी ७५ लाख १८ हजार
वाशिम                २ कोटी १४ लाख १७ हजार
----------------------------------------------
एकूण                   १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपये

Web Title: Payment of 15 crores to electricity consumers in five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.