मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची रक्कम!

By Admin | Updated: May 25, 2017 01:36 IST2017-05-25T01:36:19+5:302017-05-25T01:36:19+5:30

मनपा लेखा विभागाचा कारभार; टक्केवारीच्या बदल्यात खिरापत

Pay Commission Amount! | मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची रक्कम!

मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची रक्कम!

आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम अदा करण्यासोबतच लेखा विभागाने एक-दोन नव्हे, तर तब्बल ४४ कर्मचाऱ्यांवर सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेची अक्षरश: लूट केल्याची माहिती उजेडात आली आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, १७ कर्मचाऱ्यांना ही रक्कम अदा करताना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वळती करण्यात आली. त्यासाठी लेखा विभागाच्या स्तरावर कोणतीही नस्ती चालविण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर २ हजार २०० कर्मचारी सेवारत आहेत. पाचव्या वेतन आयोगाची रक्कम मिळावी, यासाठी कर्मचारी प्रशासनाकडे तगादा लावतात. अर्थात या रकमेवर त्यांचा अधिकार असल्यामुळे प्रशासनाकडून उपलब्ध निधीनुसार आणि संबंधित कर्मचाऱ्याची निकड लक्षात घेता त्याला रक्कम अदा केली जाते. तीन वर्षांपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला.
पाचव्या वेतन आयोगाची रकम थकीत असताना काही विशिष्ट कर्मचारी सहाव्या वेतनासाठी आग्रही आहेत. काही कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे पैशांची गरज भासत असली, तरी तिजोरीत पैसा नसल्यामुळे सहाव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला प्रशासनाने नकार दिला आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त अजय लहाने यांचे स्पष्ट निर्देश असतानादेखील लेखा विभागाने तब्बल ४४ कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या रकमेचा लाभ मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचासुद्धा समावेश आहे. हा प्रकार उजेडात येताच मनपा आयुक्त लहाने यांनी लेखाधिकारी दिनकर बावस्कर, उपलेखापाल अतुल दलाल, पेन्शन विभागातील लिपिक अशोक सोळंके यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. लेखाधिकारी बावस्कर वगळता इतर दोन कर्मचाऱ्यांनी त्यांचा खुलासा सादर केला असला, तरी त्यामध्ये ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्याचे नमूद केले, हे येथे उल्लेखनीय.

लेखा विभागाचा कारभार हवेत!
लेखा विभागात अंदाधुंद कारभार सुरू आहे. लेखापाल पदाचा प्रभार अरुण पाचपोर यांच्याकडे आहे. असे असले तरी उपलेखापाल अतुल दलाल हेसुद्धा अनेकदा प्रभारी लेखापाल म्हणून महत्त्वाच्या फायली निकाली काढत असल्याची माहिती आहे. या विभागातील ‘दलालां’चा सुळसुळाट व एकूणच कारभार पाहता २०१५-१६, २०१६-१७ या कालावधीतील कामकाजाचे लेखापरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

भविष्य निर्वाह निधीचा आडोसा!
लेखा विभागातील ‘दलालां’नी १७ कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थेट अदा न करता त्यांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वळती केली. त्या माध्यमातून रक्कम अदा करण्यात आली. यासाठी प्रशासकीय स्तरावर कोणतीही नस्ती चालवण्यात आली नाही, हे येथे उल्लेखनीय. हे १७ लाभार्थी कोण आणि त्यांना रक्कम कशा प्रकारे अदा केली, याचा शोध प्रशासनाने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

गरजूंना ठेंगा; कर्मचाऱ्यांमध्ये रोष
हक्काचे पैसे मिळावेत, यासाठी कर्मचारी प्रशासनाकडे अनेकदा अर्ज, विनंत्या करतात. या ठिकाणी गरजू कर्मचाऱ्यांना ठेंगा दाखवत खिसे भरणाऱ्या विशिष्ट कर्मचाऱ्यांना रकमेचे वाटप करण्यात आल्याने इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Pay Commission Amount!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.