पाटबंधारे विभागाची पालिकेला नोटीस

By Admin | Updated: February 2, 2016 02:01 IST2016-02-02T02:01:22+5:302016-02-02T02:01:22+5:30

पाणीपट्टीचे २.२२ कोटी थकले; पैसे न भरल्यास पाणीपुरवठा बंद

Patiala notice of Municipal Corporation | पाटबंधारे विभागाची पालिकेला नोटीस

पाटबंधारे विभागाची पालिकेला नोटीस

अकोला: महापालिकेकडे पाणीपुरवठय़ाची २ कोटी २२ लाखांची पाणीपट्टी थकल्याने सिंचन विभागाने नोटीस बजावली असून, येत्या पंधरा दिवसांत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपत आल्याने शासनाने थकीत महसूल वसुलीवर लक्ष केंद्रित केले असून, त्याअनुषंगाने पाणीपट्टी वसूल करण्याची तातडीची सूचना सिंचन विभागाला देण्यात आली आहे. काटेपूर्णा धरणातून यावर्षी सिंचनाला देण्यात येणार्‍या पाण्यावर प्रतिबंध घालण्यात आला असून, अकोला शहराची पाण्याची गरज बघता, ते केवळ अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या आरक्षित पाण्यात शहराला दरमहा १.८७ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात येत आहे; परंतु महानगरपालिकेकडे मागील वर्षापासून पाणीपट्टी थकली आहे. मागील वर्षी दोन कोटी रुपये पाणीपट्टी होती. त्यातील ९८ लाख रुपये पाटबंधारे विभागाला दिले होते. एक कोटीची रक्कम मात्र थकली होती. यावर्षी त्यात आणखी एक कोटीची भर पडली असून, आजमितीस ही रक्कम २ कोटी २२ लाख रुपयांपर्यंंत पोहोचली आहे. शासनाने महसूल वसुलीचा तगादा लावल्याने पाटबंधारे विभागाने महापालिकेला नोटीस बजावली असूून, तातडीने ही रक्कम भरावी, अन्यथा शहराला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल,असा इशारा या नोटीसमध्ये दिला आहे. पाटबंधारे विभाग आता पाणीपट्टीच्या रकमेची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, मूर्तिजापूर शहराला पाटबंधारे विभागाच्या उमा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तथापि, मूर्तिजापूर नगरपालिकेकडे पाणीपट्टीचे १ कोटी १८ लाख रुपये थकले आहेत. त्यामुळे या नगरपालिकेला नोटीस देण्यात आली आहे.

Web Title: Patiala notice of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.