रेल्वे स्टेशन परिसरातील ‘पार्किंग’ व्यवस्था सुरळीत करा!
By Admin | Updated: April 9, 2017 01:28 IST2017-04-09T01:28:28+5:302017-04-09T01:28:28+5:30
गोपीकिशन बाजोरिया यांचे रेल्वे प्रशासन, वाहतूक शाखेला निर्देश.

रेल्वे स्टेशन परिसरातील ‘पार्किंग’ व्यवस्था सुरळीत करा!
अकोला : प्रवासी आणि वाहनधारकांना त्रास होणार नाही, यासाठी अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील "पार्किंग" व्यवस्था तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी शनिवारी सायंकाळी रेल्वे प्रशासनासह पोलीस व वाहतूक शाखेला दिले.
रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंगबाबत अडचणींसंदर्भात आ. बाजोरिया यांनी पार्किंग व्यवस्थेची पाहणी करून रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग, शहर वाहतूक शाखा आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्यांसोबत चर्चा केली. त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशनवर नातेवाइकांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी येणार्या वाहनधारकांना प्रवेशद्वारावरच वाहन पार्किंंगमध्ये लावण्याची सक्ती केली जाते. चारचाकी वाहनांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश व बाहेर जाण्यासाठी नसलेली व्यवस्था, व्हीआयपी वाहनांसह दुचाकी-तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी वेगवेगळी नसलेली व्यवस्था आणि पार्किंगच्या परिसरात लावण्यात आलेली फलके इत्यादी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत रेल्वे स्टेशन परिसरात नातेवाइकांना सोडण्यासाठी व घेण्यासाठी येणार्या वाहनधारकांना प्रवेशद्वारावरच अडवून वाहन पार्किंंगमध्ये लावण्याची सक्ती करण्यात येऊ नये, चारचाकी वाहनांसाठी प्रवेश आणि बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच व्हीआयपी वाहनांसह तीनचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी वेगवेगळी पार्किंंगची व्यवस्था करून रेल्वे स्टेशन परिसरातील पार्किंंगची व्यवस्था सुस्थितीत करण्याचे निर्देश आ. गोपीकिशन बाजोरिया यांनी दिले. यावेळी अकोला रेल्वेस्थानक अतिरिक्त प्रबंधक पी.एस.भट्ट, रेल्वे विभागाचे अकोला सेक्शन वरिष्ठ अभियता अरविंद रायबोले, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावकार, शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे, रेल्वे सुरक्षा दलाचे (जीआरपी) पोलीस उपनिरीक्षक आर.एन. यादव, आशू शर्मा, गणेश जकाते, रेल्वे वाणिज्य निरीक्षक मोहम्मद यामीन अन्सारी, नगरसेवक साजीदखान पठाण, गजानन चव्हाण उपस्थित होते.