संतोषकुमार गवई
पातूर: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. परिणामी, इंग्रजी शाळांत शिक्षण घेणाऱ्या सामान्यांच्या मुलांचा प्रवेश आता जिल्हा परिषद शाळेमध्ये केला जात असल्याचे चित्र पातूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील इंग्रजी कॉन्व्हेंटचे भवितव्य धोक्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रकोप आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक सामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे आर्थिक घडी विस्कळीत झाली. कोरोनापूर्वी इंग्रजी कॉन्व्हेंटमधील मुलांना शिकविण्याकडे पालकांचा कल होता. त्यामुळे ग्रामीण भागात इंग्रजी शाळांचे मोठ्या प्रमाणावर पीक आले होते, परंतु जीवघेण्या कोरोनाने आता सारे चित्र बदलवून टाकले आहे. कोरोनामुळे घरात पैसे नाही. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात इंग्रजी शाळांची फी भरावी तरी कशी, असा प्रश्न पालकांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे यावर्षीच्या सत्रात अनेक पालक खासगी इंग्रजी शाळांमधून आपल्या मुलांचा दाखला काढून घेत असल्यामुळे खासगी शाळांपुढे संकट उभे ठाकले आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळाच बंद आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोगही हवा तसा यशस्वी ठरला नाही. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा यामुळे अभ्यासावरही परिणाम झाला. तसेच ऑनलाईनमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक पालक जिल्हा परिषद शाळेत मुलांचा प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे.
--------------------------
खासगी इंग्रजी शाळा सापडल्या आर्थिक समस्येत
दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने अनेक पालकांनी शाळांची फी भरली नाही. या शाळांनी कर्ज काढून स्कूल बसेस घेतल्या. पालकांकडून फी मिळत नसल्याने बँकांच्या कर्जाचे हप्ते भरायचे कसे, हा प्रश्नदेखील या शाळा प्रशासनापुढे उभा ठाकला आहे.
-------------------
ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांमध्ये संताप
राज्य शासनाने पाचवी व अकरावीचे ऑनलाईन वर्ग सुरू केले आहे. त्यासाठी मोबाईल असणे गरजेचे आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात नेटवर्कचा अभाव असल्याने ऑनलाईन शिक्षणामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे ऑफलाईन शिक्षण सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.
-------------------------
गेल्या दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे ग्रामीण भागात शिक्षणाची प्रचंड वाताहात झाल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा असल्यामुळे गणित, विज्ञानसारखे विषय शिकवताना अडचणीचे जात आहेत. सर्वांच्या सहमतीने ग्रामीण भागातील शाळा लवकर सुरू होणे अपेक्षित असून, सध्यातरी पालकांचा कल जि.प. शाळांकडे वाढलेला दिसून येत आहे.
- धीरज खंडारे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, पिंपरडोळी.
-----------------------------------
शिक्षक शाळेत, विद्यार्थी मात्र घरात
कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे शासनाने ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ऑनलाईन अध्यापन सुरू आहे. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहेच; मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून ५० टक्केचा निकष आहे. शिक्षक ऑनलाईन अध्यापन शाळेसह, घरातून करीत आहेत.