पंदेकृवित आंतराष्ट्रीय शेतकरी मेळावा!
By Admin | Updated: November 11, 2014 23:37 IST2014-11-11T23:37:30+5:302014-11-11T23:37:30+5:30
कोरडवाहू, सिंचन, व्यावसायिक शेतीवर होणार मंथन; विदेशी शेतकरी राहणार उपस्थित.

पंदेकृवित आंतराष्ट्रीय शेतकरी मेळावा!
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात येत्या डिसेंबर महिन्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्याला अनेक देशातील प्रगतिशील शेतकरी उपस्थित राहणार आहेत. बदलते हवामान, कोरडवाहू शेती, ओलिताची शेती, तसेच व्यावसायीक शेती या विषयांवर या मेळाव्यात मंथन होणार आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी देशातील पहिले कृषी प्रदर्शन दिल्ली येथे भरविले होते. शेतकर्यांना आधुनिक शेती व शेतीसंबधीच्या नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्यांनी ते अवगत करावे, हा त्या कृषी प्रदर्शनाच्या आयोजनामागचा उद्देश होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ती पंरपरा कायम ठेवली असून, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून, विद्यापीठात कृषी मेळावा, प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून कृषी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, संशोधन आणि शेती विकासासाठीच्या विद्यापीठाच्या शिफारशी शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृषी विद्यापीठात प्रथमच आंतरराष्ट्रीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, विविध देशातील प्रगतिशील, तज्ज्ञ शेतकरी या प्रदर्शनीला उपस्थित राहणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. एस. एम. टाले यांनी कळवले.