पांडे गुरुजी, माधुरी गावंडेंना शिवसेनेतून डच्चू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 02:09 IST2016-08-18T02:09:49+5:302016-08-18T02:09:49+5:30
अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पांडे गुरुजी व माधुरी गावंडेनी केली होती बंडखोरी.

पांडे गुरुजी, माधुरी गावंडेंना शिवसेनेतून डच्चू!
अकोला, दि १७ : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी गत जूनमध्ये झालेल्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांना अखेर शिवसेनेतून डच्चू देण्यात आला आहे. दोघांनाही शिवसेनेतून काढून टाकण्यात आल्याचा आदेश शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी दिला.
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गत ३0 जून निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी नितीन टाले देशमुख व उपाध्यक्ष पदासाठी ज्योत्स्ना बहाळे यांना शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी मतदान करण्याचा आदेश (व्हीप) जारी करण्यात आला होता. परंतु शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी मतदान न करता तटस्थ राहिले होते. तर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सदस्य माधुरी गावंडे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांना मतदान केले होते.पक्षादेशाचे पालन न करता मतदान केल्याने व पक्षादेशाचे उल्लंघन केल्याने, यासंदर्भात आपल्याविरुद्ध कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत खुलासा सादर करण्याची नोटीस शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी चंद्रशेखर पांडे गुरुजी व माधुरी गावंडे यांना त्याच दिवशी बजावली होती. तसेच चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदावरून काढून, त्यांच्या जागी नितीन देशमुख यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेशही शिवसेना उपनेते तथा संपर्कप्रमुख खासदार अरविंद सावंत यांनी दिला होता. त्यानंतर गत १३ जुलै झालेल्या जिल्हा परिषद सभापतीपदांच्या निवडणुकीत रोजी शिवसेनेच्या बंडखोर सदस्य माधुरी गावंडे यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आणि खातेवाटपात त्यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन सभापतीपद देण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर पांडे गुरुजी आणि कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे यांना शिवसेनेतून काढण्यात येत असल्याचा आदेश मुंबई येथील शिवसेना भवनातून, शिवसेनेचे सचिव तथा पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख खासदार अनिल देसाई यांनी बुधवारी दिला.