पंदेकृविने केली जॉइंट अॅग्रोस्कोची तयारी!
By Admin | Updated: May 19, 2017 01:09 IST2017-05-19T01:09:17+5:302017-05-19T01:09:17+5:30
पुढच्या आठवड्यात परभणीला होणार अॅग्रोस्को

पंदेकृविने केली जॉइंट अॅग्रोस्कोची तयारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यस्तरीय संयुक्त संशोधन आढावा सभा (जॉइंट अॅग्रोस्को) यावर्षी परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होणार असून, यासाठीची तयारी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेली बी-बियाणे, नवे वाण, तंत्रज्ञानावर आढावा सभेमध्ये मंथन होऊन मान्यता दिली जाणार आहे. यावर्षी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सभेला उपस्थिती राहणार असल्याचे वृत्त आहे. यावर्षी २८ ते ३० मे यादरम्यान परभणीला जॉइंट अॅग्रोस्को होणार आहे. यासाठीची तयारी राज्यातील इतर तीन कृषी विद्यापीठांसह अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुरू केली आहे. या कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेले संशोधन किंवा मागील काही वर्षांपासून सुरू असलेले संशोधन जे यावर्षी पूर्ण झाले, या सर्व संशोधन, तंत्रज्ञान, शेती शिफारशी तेथे मांडल्या जाणार आहेत. या सभेला कृषी मंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडक र हे या संशोधन आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी असतील.