जिल्ह्यात आता पंचरंगी लढती
By Admin | Updated: September 26, 2014 01:58 IST2014-09-26T01:58:48+5:302014-09-26T01:58:48+5:30
महायुती व आघाडी दोन्ही दुभंगल्यामुळे अकोला जिल्ह्यात पंचरंगी लढतची चिन्हे.

जिल्ह्यात आता पंचरंगी लढती
अकोला : अखेर शिवसेना -भाजप महायुतीचा घटस्फोट झाला असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीही दुभंगली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी आणि धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होणार आहे. मतविभाजनाच्या समीकरणात राज्यभरात चौरंगी लढत होणार असली तरी, अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात पंचरंगी लढत रंगणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्यावरून गेल्या २५ वर्षांपासून असलेली शिवसेना- भाजपा युती गुरुवारी सायंकाळी तुटली. युती पाठोपाठ गेल्या १५ वर्षांपासून एकत्र असलेली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतही बिघाडी झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार असल्याने, राज्यात चौरंगी लढती रंगणार असल्या तरी, अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मात्र पंचरंगी लढत होणार आहे. त्यामध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघ, अशी पंचरंगी लढत रंगणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. या लढतीत मनसे देखील आपली ताकद आजमावणार आहे.