स्टेराॅइड, सीटीस्कॅनचा अतिमारा कोरोना रुग्णांसाठी ठरतोय घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:45+5:302021-05-05T04:30:45+5:30
कोरोनामुळे रुग्णांमधील प्रतिकारशक्ती अतिप्रमाणात वाढते. एक प्रकारे ही प्रतिकारशक्ती अनियंत्रित असते. ही प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी स्टेराॅइडचा वापर केला जातो. ...

स्टेराॅइड, सीटीस्कॅनचा अतिमारा कोरोना रुग्णांसाठी ठरतोय घातक
कोरोनामुळे रुग्णांमधील प्रतिकारशक्ती अतिप्रमाणात वाढते. एक प्रकारे ही प्रतिकारशक्ती अनियंत्रित असते. ही प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी स्टेराॅइडचा वापर केला जातो. त्यासाठी योग्य प्रमाणात डोस देणे गरजेचे असते; परंतु अनेक ठिकाणी त्याचे प्रमाणापेक्षा अधिक डोस देण्याचा प्रकार होत आहेत. त्यातून रुग्णांची प्रतिकारशक्ती अधिक प्रमाणात दाबली जाते आणि त्यातून इतर संसर्गजन्य आजारांनाही तोंड देण्याची वेळ रुग्णांवर ओढवते. शिवाय, भविष्यातही रुग्णाला दुष्परिणामांना सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाच्या निदानासाठी सीटीस्कॅनद्वारे हाय रिझोल्युशन काॅम्प्युटराइज्ड टोमोग्राफी (एचआरसीटी) केली जात आहे. कोरोनापूर्वी फारशी एचआरसीटी होत नसे; परंतु हे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा रुग्णांचा एचआरसीटी स्कोअर किती आहे, हे पाहण्यासाठी वारंवार तपासणीचे प्रकार होत आहेत. याबाबत तज्ज्ञांनी वेळीच काळजी घेत गरज असेल तरच सीटीस्कॅन करण्याचे आवाहन केले आहे.
एकदा सीटीस्कॅन करणे म्हणजे ८० ते १४० एक्स-रे
सीटीस्कॅनमधून निघणारे क्ष-किरण जास्त प्रमाणात असतात. एकदा सीटीस्कॅन काढणे म्हणजे जवळपास ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे आहे. एवढ्या सगळ्या एक्स-रेतील रेडिएशन एकदाच होते. त्यामुळे अनावश्यक आणि गरजेपेक्षा जास्त सीटीस्कॅन काढणे म्हणजे कर्करोगाला आमंत्रण दिल्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
प्रमाणापेक्षा अधिक स्टेराॅइड घातकच
स्टेरॉइडचा अधिक वापर आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे म्युकर मायकोसीस म्हणजे बुरशीजन्य आजाराचा धोका संभवतो. बुरशीच्या संसर्गामुळे डोळा गमावण्याची भीती असते. शिवाय प्रतिकारशक्ती दाबल्याने संधीसाधू आजार, अन्य संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे, रक्तदाब वाढणे, मोतीबिंदूचा धोका, ज्यांना मधुमेह नाही, त्यांना मधुमेह होणे, हाडांवर परिणाम होणे, अशा विकारांनाही सामोरे जावे लागू शकते.
प्रमाणापेक्षा अधिक सीटीस्कॅनचे दुष्परिणाम
एकदा रेडिएशन घेणेही शरीरासाठी अपायकारक असते. एक सीटीस्कॅन अनेक एक्स-रे काढल्याप्रमाणे आहे. ३ पेक्षा अधिक वेळा सीटीस्कॅन करण्यातून कर्करोगाचा धोका वाढतो. एचआरसीटी तपासणीचा शरीरावर आज ना उद्या परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.