बाह्यस्रोत तंत्रज्ञांची ९८०० रुपये वेतनावर बोळवण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 13:19 IST2019-12-25T13:19:12+5:302019-12-25T13:19:17+5:30
१५ हजार ४७९ दरमहा वेतन मिळणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ ८५०० व नोव्हेंबर महिन्यापासून ९८०० रुपये वेतनावर बोळवण होत असल्याचा आरोप या कामगारांनी तक्रारीतून केला आहे.

बाह्यस्रोत तंत्रज्ञांची ९८०० रुपये वेतनावर बोळवण!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महाराष्ट्र शासनाच्या किमान वेतन कायदा व भारतीय कामगार कायद्यानुुसार वेतन मिळत नसल्याची तक्रार महावितरणच्याअकोला मंडळातील विविध वीज केंद्रांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी बाह््यस्रोत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांनी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली आहे. नियमानुसार कपातीनंतर १५ हजार ४७९ दरमहा वेतन मिळणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ ८५०० व नोव्हेंबर महिन्यापासून ९८०० रुपये वेतनावर बोळवण होत असल्याचा आरोप या कामगारांनी तक्रारीतून केला आहे.
महावितरणच्या अकोला जिल्ह्यातील विविध वीज केंद्रांवर जवळपास १२५ बाह्यस्रोत तंत्रज्ञ देखभाल दुरुस्तीचे कामे करीत आहेत. हे सर्व कामगार औरंगाबाद जिल्ह्यातील आजुबाई सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेद्वारे बाह्यस्रोत कामगार म्हणून कार्यरत असून, त्यांना १ आॅक्टोबर २०१९ पासून २० टक्के वाढीव पगारानुसार दरमहा २६ दिवसांचे १७ हजार ४७ रुपये वेतन आहे.
त्यामध्ये १५६८ रुपयांची शासकीय कपात झाल्यानंतर या कामगारांच्या बँक खात्यात दरमहा १५ हजार ४७९ रुपये वेतन मिळणे क्रमप्राप्त आहे; परंतु आतापर्यंत दरमहा केवळ ८५०० रुपये मिळत होते. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून १३४०० रुपये एवढा पगार होईल, असे सांगण्यात आले.
प्रत्यक्षात मात्र ९८०० रुपये पगार घ्यावा व वरील ३६०० रुपये कंपनीच्या अधिकाऱ्यांना द्यावे, असे सांगण्यात आल्याचा आरोप तक्रारकर्त्या तंत्रज्ञांनी केला आहे.
या कामगारांचे अजूनपर्यंत बँक खातेही उघडण्यात आले नसून, विड्रॉल स्लिपवर सह्या घेण्यात आल्या आहेत, तसेच शासकीय कपात कोठे व कोणत्या खात्यात जमा होते, विमा काढला आहे अथवा नाही, याचीही माहिती नसल्याचे तक्रारदार कामगारांनी निवेदनात म्हटले आहे. नियमानुसार शासकीय कपात करून वेतन अदा करावे व आमचा जीवन विमा काढावा,अशी मागणीही या कामगारांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन डॉ. पाटील यांनी मुख्य अभियंत्यांशी पत्रव्यवहार करून माहिती मागविली आहे.
बाह्यस्रोत कामगारांची सेवा पुरविणाºया कंत्राटदार संस्थेच्या खात्यात महावितरणकडून दरमहा निश्चित रक्कम वळती केली जाते. सदर कंत्राटदार संस्था कामगारांना योग्य वेतन देत आहे किंवा नाही, याचीही खातरजमा आम्ही केली आहे. त्यामुळे महावितरणचा याच्याशी संबंध नाही. या तक्रारीच्या संदर्भात आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मागविलेली माहिती लवकरच देण्यात येईल.
- अनिल डोये, मुख्य अभियंता, अकोला परिमंडळ.