३५ लाखांपैकी आले केवळ सहा लाख
By Admin | Updated: June 13, 2014 18:53 IST2014-06-12T23:47:54+5:302014-06-13T18:53:44+5:30
सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांचे अनुदान

३५ लाखांपैकी आले केवळ सहा लाख
अकोला : सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये विवाहबद्ध झालेल्या जिल्ह्यातील २९५ जोडप्यांच्या अनुदानापोटी गेल्या दोन वर्षांपासून शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडे प्रलंबित असलेल्या ३५ लाख ४० हजारांच्या निधीपैकी केवळ सहा लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित अनुदानाचा निधी अद्यापही प्रलंबित असल्याचे चित्र आहे.
शासनाच्या शुभमंगल सामूहिक विवाह योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह करणार्या जोडप्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये आणि सामूहिक विवाह सोहळा घडवून आणणार्या संस्थेस दोन हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेत अकोला जिल्ह्यात सन २०११-१२ मध्ये घेण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये २९५ जोडपी विवाहबद्ध झाली होती. या जोडप्यांसह संबंधित संस्थांकरिता जिल्हा महिला व बालविकास विभागामार्फत ३५ लाख ४० हजारांचे अनुदान मंजूर करण्यात आले; मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्यांना अनुदानाचा लाभ मिळाला नाही. या अनुदानासाठी ३५ लाख ४० हजारांच्या निधीची मागणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत महिला व बालकल्याण आयुक्तालयाकडे करण्यात आली. दोन वर्षांपासून प्रलंबित अनुदानापैकी केवळ सहा लाखांचे अनुदान महिला व बालकल्याण आयुक्तालयामार्फत गेल्या दहा दिवसांपूर्वी प्राप्त झाले. उर्वरित २९ लाख ४० हजारांचे अनुदान अद्यापही प्रलंबित आहे.