अनाथ अनुराधाचे सुख नियतीलाही पाहवले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:20 IST2021-01-20T04:20:02+5:302021-01-20T04:20:02+5:30

अकाेला : गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरल्यानंतर पती मिळाला. कुटुंब मिळाले. अनाथ ...

Orphan Anuradha's happiness did not see destiny | अनाथ अनुराधाचे सुख नियतीलाही पाहवले नाही

अनाथ अनुराधाचे सुख नियतीलाही पाहवले नाही

अकाेला : गुडधी येथील अनाथाश्रमात लहानाची माेठी झालेल्या अनुराधाचा विवाह ३१ जानेवारी राेजी ठरल्यानंतर पती मिळाला. कुटुंब मिळाले. अनाथ असल्याचे दु:ख आता दूर हाेईल या आनंदात असतानाच तिचे सुख नियतीलाही पाहवले नसल्याचे १९ जानेवारी सायंकाळी घडलेल्या घटनेवरून समाेर आले. लग्नाची तयारी करीत असतानाच अनुराधाला अनाथाश्रमातच विजेचा झटका लागला आणि काही क्षणातच तिचा सर्वाेपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

लहान असतानाच अनुराधा वानखडे हिला गुडधी येथील अनाथाश्रमामध्ये ठेवण्यात आले हाेते. लहानाची माेठी झाली. अनाथ असल्याचे प्रचंड दु:ख असतानाच १८ वर्षाची हाेताच तिला जुने शहरातील शिवसेना वसाहत येथील रहिवासी शिवा वानरे यांनी लग्नाची मागणी घातली. अनुराधालाही प्रचंड आनंद झाला. आयुष्यातील दु:खाची रात्र ३१ जानेवारी राेजी संपणार व विवाह बंधनात अडकण्याच्या आनंदात असतानाच अनुराधाला अनाथाश्रमामध्ये मंगळवारी सायंकाळी वरच्या माळ्यावर विजेचा धक्का लागला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या अनुराधाला तातडीने सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारही सुरू झाले मात्र काही वेळातच अनुराधाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती शिवा वानरे यांच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनीही तातडीने रुग्णालयात धाव घेतली. अनुराधाचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्यावर दु:खाचा डाेंगर काेसळला. एका अनाथ मुलीशी विवाह करून एक वेगळी प्रेरणा देण्याचा प्रयत्न शिवाने केला हाेता. मात्र दाेघांचेही सुख नियतीला पाहवले नाही आणि एका अपघातात अनुराधाचा मृत्यू हाेताच एका संसारवेलीचा सुरुवात हाेण्यापूर्वीच घात झाला.

Web Title: Orphan Anuradha's happiness did not see destiny