१४ डिपॉझिटर्सला २७ लाख रुपये देण्याचा आदेश
By Admin | Updated: March 13, 2016 01:51 IST2016-03-13T01:51:31+5:302016-03-13T01:51:31+5:30
श्यामलाल चंगोईवाला कुटुंबीयांना ग्राहक मंचाची चपराक.

१४ डिपॉझिटर्सला २७ लाख रुपये देण्याचा आदेश
अकोला: व्यवसाय वाढीच्या नावाखाली एजंटसह मित्रांच्या माध्यमातून १४ गुंतवणूकदारांकडून २७ लाख रुपये व्याजाने घेऊन त्याची परतफेड न करणार्या श्यामलाल रामलाल चंगोईवाला यांना ग्राहक तक्रार निवारण मंचाने चांगलीच चपराक दिली आहे. सदर १४ गुंतवणूकदारांना त्यांची २७ लाख रुपयांची रक्कम ४५ दिवसांच्या आत व्याजासह परत करण्याचे आदेश तक्रार मंचने दिले आहेत. शहरातील रहिवासी तसेच उद्योजक भारती सुभाष पटनाईक, अवंतिका गोपाल खेतान, सुनंदा रामदास जावरकर, केतकी किशोर देशपांडे, डॉ. देवीदास हागे, रश्मी श्रीकांत पेंढारकर, श्रीकांत विष्णू पेंढारकर, श्रेयश श्रीकांत पेंढारकर व अमिताभ चतुभरुज अग्रवाल यांच्याकडून चंगोईवाला इंडस्ट्रीजचे संचालक श्यामलाल रामलाल चंगोईवाला यांनी स्वत:सह चंगोईवाला इंडस्ट्रीज, त्यांची पत्नी मीरा चंगोईवाला मुलगा देवेश चंगोईवाला यांच्या नावाने सुमारे १४ लाख ६0 हजार रुपये कर्ज स्वरूपात व्याजाने घेतले होते. धरवड पावतीच्या स्वरूपात झालेल्या या व्यवहारात देय रकमेचा भरणा करण्याच्या तारखेला चंगोईवाला यांनी हात वर केले होते. त्यामुळे सदर कर्ज देणार्यांनी चंगोईवाला यांना रक्कम देण्याची मौखिक विनंती केली. वारंवार पैशाची मागणी केल्यानंतर चंगोईवाला यांनी कर्ज पुरवठा करणार्यांना टाळाटाळ करणे सुरू केले. त्यामुळे त्यांनी विधिज्ञामार्फत नोटीस दिली; मात्र चंगोईवाला यांनी सदर नोटीसला उत्तर दिले नाही. त्यानंतर गुंतवणूकदारांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. यावर तक्रार निवारण मंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर तसेच गुंतवणूकदारांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद व धरवड पावतीच्या व्यवहारासंदर्भात यापूर्वी न्यायालयाने दिलेले निकाल समोर ठेवून ग्राहक तक्रार निवारण मंचने चंगोईवाला कुटुंबीय डिफॉल्टर असल्याचे जाहीर करून त्यांना चांगलीच चपराक दिली. तसेच चंगोईवाला यांनी २७ लाख ६0 हजार रुपयांची दिवाळखोरी केल्याचे ग्राहक मंचाने आदेशात नमूद करून १४ गुंतवणूकदारांना चंगोईवाला यांनी २७ लाख ६0 हजार रुपये ४५ दिवसांच्या आतमध्ये ८ टक्के व्याजदराने परत करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी गुंतवणूकदारांतर्फे अँड. मनोज अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.