तूर खरेदीत समिती, व्यापारी, दलालांच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: April 26, 2017 01:34 IST2017-04-26T01:34:25+5:302017-04-26T01:34:25+5:30
मानकर यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचाही विचारला जाब

तूर खरेदीत समिती, व्यापारी, दलालांच्या चौकशीचे आदेश
अकोला : बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या बाजार समितीतील केंद्रावर विक्री झाल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समिती, व्यापारी, दलालांची चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. सोबतच केवळ जाब विचारल्यावरून भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याचीही चौकशी करण्याचे आदेश आहेत.
शेतकऱ्यांना यावर्षी तुरीचे चांगलेच उत्पादन झाले; मात्र बाजार समितीमध्ये तुरीला पुरेसा भाव नसल्याने नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले.
प्रत्यक्षात बाजार समितीमधील व्यापारी आणि नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना चांगलेच रडकुंडीला आणले.
बाजारात कमी दराने तूर खरेदी करून तीच तूर नाफेडच्या केंद्रात विकण्याचा सपाटाच व्यापारी, दलाल, कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्थापनाने लावला.
संगनमताने हा प्रकार करण्यात आला, त्यामुळे या प्रकाराची तक्रार भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी केंद्र व राज्य शासनाकडे सातत्याने केली. त्याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीचे आदेश दिले.
अशी होणार चौकशी
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या तुरीचे काय केले, कमी दराने खरेदी करणाऱ्यांवर बाजार समितीने कोणती कारवाई केली, नाफेडमध्ये तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून कोणाला पैसे दिले गेले, याची सखोल तपासणी उपनिबंधकांकडून केली जाणार आहे. त्यामध्ये दोषी आढळणारांवर तत्काळ कारवाई करण्याचेही बजावले आहे.
जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाजपेयींची चौकशी
बाजार समितीमध्ये नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याने त्यांच्या बोलावण्यावरून तेथे गेलेले भारत कृषक समाजाचे अध्यक्ष प्रकाश मानकर यांनी तक्रारीतून केवळ जाब विचारला असताना त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले, याप्रकरणी महाराष्ट्र स्टेट को-आॅप मार्केटिंग फेडरेशनचे मार्केटिंग अधिकारी मनोज वाजपेयी यांचीही चौकशी करण्याचे आदेश सहकार मंत्री देशमुख यांनी दिले आहेत.
तुरीची कमी दराने खरेदी करणारे ८८ व्यापारी
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उघडपणे कमी दराने तुरीची खरेदी करणारे ८८ व्यापारी आहेत. त्यांची यादीही तक्रारीसोबत देण्यात आली. सोबतच ज्या शेतकऱ्यांनी कमी दराने तुरीची विक्री केली, त्या २०० जणांची यादीही देण्यात आली. त्यांच्यावर बाजार समितीने कोणतीच कारवाई केली नाही.
नाफेडच्या तूर खरेदीमध्ये झालेल्या प्रकाराच्या तक्रारीवरून सहकार मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सहकार विभागाकडून लवकरच चौकशी सुरू केली जाईल.
- जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला.