झेंडा व फलक काढण्यास विरोध
By Admin | Updated: January 14, 2015 01:15 IST2015-01-14T01:15:16+5:302015-01-14T01:15:16+5:30
अखेर पोलीस बंदोबस्तात काढला झेंडा व फलक.

झेंडा व फलक काढण्यास विरोध
अकोला: अकोला- आकोट मार्गावर लागलेला एक झेंडा व फलक काढण्यासाठी घटनास्थळावर सोमवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावावा लागला. परिसरातील महिलांच्या विरोधामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन मोहीमही थांबवावी लागली. दरम्यान, अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविल्यानंतर मोहिमेस पुन्हा प्रारंभ झाला. पोलीस व मनपाच्या विशेष मोहिमेंतर्गत मंगळवारी दुपारी आकोट फैल परिसरात अनधिकृत फलक, झेंडे काढण्याची कारवाई करण्यात आली. रेल्वे पुलापासून कारवाईस प्रारंभ झाला. पथकाने रस्त्यांच्या कडेला विद्युत खांबांवर लागलेले फलक, झेंडे काढले आणि पथक आंबेडनगरात पोहोचले. याठिकाणी पथकाने अशोक चक्र असलेला झेंडा काढण्यास प्रारंभ केला; परंतु त्याला परिसरातील नागरिकांनी विरोध केला आणि रेल्वे मालधक्का आणि आकोट फैल पोलीस ठाण्यालगत असलेले धार्मिक स्थळ हटविण्याची मागणी केली. त्यानंतरच झेंडा काढू दिला जाईल, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने पथकासमोर अडचण निर्माण झाली. घटनास्थळावर उपस्थित असलेले परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले व मनपाच्या अधिकार्यांनी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यानंतर साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे घटनास्थळावर आले. त्यांनीही समजूत घातल्यानंतर नागरिकांनी वंदना घेतली आणि झेंडा काढण्यास सांगितले. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये अशोक चक्र असलेला झेंडा काढण्यात आला.