पातूर : पातूर येथील खानापूर रोडस्थित गजानन कॉम्प्लेक्स येथे मोंटेकार्लो रोडवेज कन्स्ट्रक्शन कंपनीचे आॅफिस आहे. या आॅफिसमध्ये कार्यरत अधिकारी व आॅपरेटरचा किरकोळ वाद झाला. या वादातून कंपनीच्या अधिकाºयाने आॅपरेटरला तिसºया माळ्यावरून फेकून दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. सुदैवाने यात प्राणावर बेतले नाही. आॅपरेटरच्या दोन्ही पायांना मात्र जबर दुखापत झाली. याप्रकरणी पातूर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता.मोंटेकार्लो रोडवेज कन्स्ट्रक्शन कंपनीत अंदाजे ३५ च्या जवळपास कामगार कार्यरत आहेत. यात काही कंपनीचे काही बडे अधिकारीदेखील तेथेच वास्तव्यास आहेत. ४ आॅक्टोबर रोजी कंपनीच्या एका अधिकाºयासोबत ग्रेडर मशीन आॅपरेटर विपीन यादव (रा. प्रसादपूर, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश) याचा वाद झाला. शाब्दिक चकमक उडाली असता, दोन अधिकाऱ्यांनी विपीन यादव यास इमारतीच्या तिसºया माळ्यावरून खाली फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याने केला आहे. घटनेमध्ये विपीन यादव हा गंभीररीत्या जखमी झाला. कंपनीच्या इतर सहकाºयांनी त्याला तातडीने अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात नेऊन उपचारासाठी दाखल केले. यात त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, पातूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नव्हता. फिर्यादीच्या वैद्यकीय अहवाल व तक्रारीनुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
ऑपरेटरला तिसऱ्या माळ्यावरून खाली फेकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 10:27 IST