गुटख्याचे ‘डोणगाव कनेक्शन’ उघड
By Admin | Updated: February 6, 2015 02:01 IST2015-02-06T02:01:16+5:302015-02-06T02:01:16+5:30
दीड लाखाचा गुटखा जप्त : एलसीबीची कारवाई.

गुटख्याचे ‘डोणगाव कनेक्शन’ उघड
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यात बुलडाणा जिल्ह्यामधून गुटखा ह्यइम्पोर्टह्ण होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमधून उघड झाले. पोलिसांनी मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील एका युवकाच्या घरामधून ५ फेब्रुवारी रोजी दीड लाखाचा गुटखा जप्त केल्याने डोणगावच्या एजंटचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी आपल्या पथकाला मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील अशोक विश्वनाथ सोनुने यांच्या घराची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या माहितीच्या आधारावर एपीआय आर.जी. चव्हाण, महेश भोसले, वाय.आर. धोत्रे, गणेश सरनाईक, सुनील मुंदे, राहुल व्यवहारे, विनोद अवगळे, विपुल शेळके, प्रदीप डाखारे, मीनाक्षी भाकरे यांचा समावेश असलेल्या पथकाने सोनुने यांच्या घरामध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांना दीड लाखाचा गुटखा आढळून आला. सदर गुटखा हा बुलडाणा जिल्ह्यातील सचिनआप्पा साखळकर याचा असल्याची माहिती विश्वनाथ सोनुने यांनी दिली. सचिन हा बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा गुटखा माफियाचा एजंट असल्याची माहिती आहे. पोलिसांनी याप्रकरणी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, सोनुने याला अटक केली. सचिन हा सध्या पसार झाला आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये शेलूबाजार व कारंजा हे गुटखा माफियाचे नवीन केंद्रबिंदू असल्याने पोलीस यावर कधी कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे.