काटेपूर्णा बॅरेजच्या बांधकामाचा मार्ग मोकळा!
By Admin | Updated: January 11, 2015 01:20 IST2015-01-11T01:20:57+5:302015-01-11T01:20:57+5:30
प्रकल्पासाठी मिळाली ६.३४ हेक्टर वनजमीन.

काटेपूर्णा बॅरेजच्या बांधकामाचा मार्ग मोकळा!
अकोला : मूर्तिजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेजसच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. या बॅरेजसाठी लागणारी ६.३४ हेक्टर वनजमीन वनविभागाने या प्रकल्पाला देण्यासाठीची मंजुरी दिली आहे.
या बॅरेजच्या कामासाठी, पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाल्याने अकोला पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी वन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. राज्य शासनासह नागपूर वनविभागचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे याकरिता पाठपुरावा करण्यात आला होता. मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांनी या संबंधीचा परिपूर्ण अहवाल भारत सरकारच्या भोपाळ येथील पर्यावरण, वन व जलपरिवर्तन मंत्रालयाकडे सादर केला होता. हा प्रकल्प बांधून झाल्यास या भागातील जनेतला फायदा होणार असल्याने भारत सरकारच्या वनसंवर्धन अधिनियम १९८0 आणि त्याअंतर्गत जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार भारत सरकारने काही अटींसह या प्रकल्पाला लागणारी ६.३४ हेक्टर जमीन देण्यासाठीची मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला लागणारी राखीव वनजमीन राज्य शासनाला देण्यासाठीची मंजुरी दिली असून, राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने गुरुवारी या आशयाचे परिपत्रक काढले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील सर्व्हे न. ३ मधील राखीव असलेली ६.३४ हेक्टर वनजमीन काटेपूर्णा प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपवन संरक्षक अकोला यांनी या आदेशाची प्रत पाठविण्याची सूचना केली आहे.