धनुर्धारी मारुतीचे राज्यातील एकमेव मंदिर अकोल्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 02:07 IST2016-04-12T01:53:33+5:302016-04-12T02:07:28+5:30
धनुर्धारी मारुतीची मूर्ती देशात कुठेच नसल्याचा पुजा-याचा दावा.

धनुर्धारी मारुतीचे राज्यातील एकमेव मंदिर अकोल्यात!
नितीन गव्हाळे /अकोला
संकटमोचन मारुतीरायाची देशभरात शेकडो मंदिरे आहेत. सर्वच मंदिरांमध्ये गदाधारी मारुतीची मूर्ती आपण बघितली आहे; परंतु अकोल्यातील गांधी रोडवरील छोट्या मंदिरात धनुर्धारी मारुतीची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. धनुर्धारी मारुतीचे मंदिर हे महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एकमेव असल्याचा दावा मंदिरातील वयोवृद्ध पुजारी श्यामसुंदर शर्मा यांनी केला.
सर्मथ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रासह विदर्भात अनेक ठिकाणी मारुतीच्या मंदिरांची उभारणी केली. कोणत्याही गावात, शहरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मारुतीचे मंदिर दिसते आणि मंदिरामध्ये गदाधारीच मारुतीची मूर्ती बघावयास मिळते. मारुतीरायाची हातात धनुष्यबाण किंवा इतर शस्त्र घेऊन असलेली मूर्ती कुठेच आढळत नाही; परंतु अकोल्यात मात्र अडीचशे वर्ष पुरातन गांधी रोडवरील छोट्या राम मंदिरात खांद्यावर धनुष्यबाण घेतलेली आणि गदा असलेली मारुतीरायाची मूर्ती एकमेव मूर्ती आहे. धनुष्यबाणाचे वहन केलेली मारुतीची मूर्ती केवळ अकोल्यात पाहावयास मिळते. ही मूर्ती या राममंदिरातील वैशिष्ट्य आहे. धनुर्धारी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यामागे अही व मही या रावणाच्या नातवांच्या कथेचा आधार घेतला असल्याचे पुजारी श्यामसुंदर शर्मा यांनी सांगितले.
धनुर्धारी मारुतीची प्रतिष्ठापना करण्यामागील आख्यायिका
गांधी रोडवरील छोटे राममंदिरातील मारुतीची मूर्ती देखणी व अनोखी अशी आहे. एका आख्यायिकेनुसार रामायण काळात अही व मही रावण होऊन गेले. ते रावणाचे नातू होते. त्यांनी राम-लक्ष्मणासोबत युद्ध केले. या युद्धात त्यांनी राम-लक्ष्मणाला बेशुद्ध केले आणि देवीला बळी देण्यासाठी स्वत:च्या महालात नेले. ही गोष्ट मारुतीला कळली. मारुतीने महालात गेल्यावर देवीचे रूप घेतले आणि देवीला पाताळात पाठवून दिले अही व मही यांना तुम्ही बाहेर जा. मी स्वत: राम-लक्ष्मणाचा बळी देते, असे सांगितले आणि राम-लक्ष्मणाकडील धनुष्यबाण घेऊन अही व मही यांना ठार केले. या कथेचा आधार घेत, या मंदिरात प्रतिष्ठापलेल्या मारुतीच्या हातात गदा आणि धनुष्यबाण आहे.