दलालमुक्तीसाठी ‘एक खिडकी योजना’
By Admin | Updated: February 11, 2015 00:57 IST2015-02-11T00:57:32+5:302015-02-11T00:57:32+5:30
आरटीओत सामान्यांना मार्गदर्शन; अर्जातील त्रुटीही काढून देणार.

दलालमुक्तीसाठी ‘एक खिडकी योजना’
हर्षनंदन वाघ /बुलडाणा:
प्रादेशिक परिवहन कार्यालय दलालमुक्त करण्यासाठी राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एक खिडकी योजना मंगळवारपासून सुरू करण्यात आली. या योजनें तर्गत नागरिकांना कार्यालयीन कामासाठी मार्गदर्शन करण्यात येणार असून, त्यांचे अर्ज तपासणे, त्यातील त्रुटी काढून देणे आदी कामं कर्मचार्यांकडून केली जातील.
दलालांच्या माध्यमातून होणारे गैरप्रकार आणि सर्वसामान्यांची लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालये दलालमुक्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशामुळे कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर कर्मचार्यांना उभे करून, येणार्या नागरिकांची आधी चौकशी केली की, मगच त्यांना कार्यालयात सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. ती तेवढी सोयीस्कर नसल्याचे स्पष्ट झाले. यावर पर्याय म्हणून परिवहन आयुक्तांनी राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू करण्याचे आदेश ३ फेब्रुवारी रोजी दिले. या आदेशान्वये १0 फेब्रुवारीपासून एक खिडकी योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेंतर्गत स्वीकारलेल्या अर्जाची तपासणी करून शिपायामार्फत त्या-त्या विभागातील संबंधित अधिकार्याकडे तो अर्ज पोहचविण्यात येणार आहे. त्या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर तो अर्ज वरिष्ठ अधिकार्यांकडे दिला जाईल. वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनुसार, तो अर्ज वितरण कक्षाकडे देण्यात येईल. त्यानंतर वितरण खिडकीतून संबंधित नागरिकांना अर्जाचे वितरण केले जाणार आहे. बुलडाण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात एका ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या. एक खिडकी योजनेमुळे शासनाच्या विविध विभागांत कामाचे नियोजन करण्यात आले असून, अनेकांना मदत होत आहे; मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू झालेल्या एक खिडकी योजनेस नागरिकांचा प्रतिसाद मिळतो का, नागरिकांना किती प्रमाणात फायदा होतो, कर्मचारी सहकार्य करतील काय, हे येणार्या काळात स्पष्ट होणार आहे.
परिवहन आयुक्तांच्या आदेशान्वये एक खिडकी योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही योजना सामान्य नागरिकांच्या सोयीची असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगीतले.