एसटी बसच्या धडकेने एक जण जागीच ठार
By Admin | Updated: March 1, 2015 21:18 IST2015-03-01T21:18:15+5:302015-03-01T21:18:15+5:30
अकोला तालुक्यातीन वणीरंभापूर जवळ अपघात.

एसटी बसच्या धडकेने एक जण जागीच ठार
वणीरंभापूर (जि. अकोला): मूर्तिजापूरहून अकोल्याकडे वेगाने जाणार्या एसटी बसने वणीरंभापूर फाट्यावर बसची वाट पाहत असलेल्या व्यक्तिला जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना १ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडली.
वणीरंभापूर येथील विजय वानखडे यांच्या घरी १ मार्च रोजी त्यांच्या मुलीचा विवाहसमारंभ होता. या विवाहास उपस्थित राहण्यासाठी नवरदेवाचे मावसे असलेले अमरावती येथील अन्न व नागरी पुरवठा विभागात नायब तहसीलदार असलेले रघुनाथ वानखडे (५२) हे आले होते. लग्नसमारंभास उपस्थित राहिल्यानंतर वानखडे अमरावतीला जाण्यासाठी सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास वणीरंभापूर फाट्यावर आले होते. अमरावतीला जाणार्या बसची वाट पाहत असताना मूर्तिजापूरकडून अकोल्याकडे जाणार्या एका एसटी बसने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रघुनाथ वानखडे हे जागीच ठार झाले. या अपघातानंतर एसटी बस तेथे न थांबता वेगाने निघून गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या येथील ग्रामस्थांनी व लग्नास उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी वणीरंभापूर फाट्यावर गतिरोधक बांधण्यात यावे, या मागणीसाठी तब्बल एक तासपर्यंत रास्तारोको आंदोलन केले. याबाबतची माहिती मिळताच बोरगाव मंजूचे ठाणेदार डी.के.आव्हाळे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गावकरी व मृतकाच्या नातेवाईकांची समजूत घातली. त्यामुळे ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. त्यानंतर पोलिसांनी वानखडे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी अकोल्यास पाठविला.