तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त!
By Admin | Updated: March 29, 2016 02:27 IST2016-03-29T02:27:31+5:302016-03-29T02:27:31+5:30
कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन; मुरुमाची अवैध वाहतूक.

तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त!
अकोला/वणीरंभापूर: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन आणि मुरुमाची अवैध वाहतूक करणार्या तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी जप्त करण्यात आली. जप्त केलेला २५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्याची कारवाई सोमवारी अकोला तहसीलदारांच्या पथकाने केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावर १0 बाय ३0 मीटर शेततळ्याचे खोदकाम करण्यात येत असून, खोदकामातील मुरूम प्रक्षेत्रातील भागात रस्ते कामांसाठी वापरण्यात येत असल्याची तक्रार अकोला तहसील कार्यालयाला प्राप्त झाली. त्यानुसार अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या नेतृत्वातील पथकाने कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रावर जाऊन शेततळ्याच्या कामाची पाहणी केली. तपासणीदरम्यान, या शेततळ्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आली नसून, अंदाजपत्रक तयार न करता, खोदकाम व उत्खननाची परवानगी घेण्यात आली नाही. तसेच शेततळ्याच्या खोदकामातील मुरूम वणीरंभापूर प्रक्षेत्रातील भागातच रस्ते कामांसाठी वापरण्यात येत असून, त्यासाठी मुरूमाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याचे आवढळून आले. त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर प्रक्षेत्रात शेततळ्याचे अवैध उत्खनन करून मुरुमाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याने, एमएच ३0 जे-९७३१, एमएच ३0 जे-६९३५ व एमएच जे ३१७६ या क्रमांकांचे तीन टॅक्ट्रर व एक जेसीबी असा अंदाजे २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. जप्त करण्यात आलेले तीन ट्रॅक्टरसह एक जेसीबी कृषी विद्यापीठामार्फत शेततळ्याच्या खोदकामासाठी व मुरूम वाहतुकीसाठी भाड्याने लावण्यात आले होते. ही कारवाई अकोल्याचे तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी सुनील देशमुख, वणीरंभापूरचे तलाठी नितीन शिंदे, महेंद्र कदम, बबनराव थिटे यांनी केली.दरम्यान तसहसीलदार राजेश्वर हांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कृषी विद्यापीठातील शेततळ्याच्या कामाचे अंदाजपत्रक नाही, उत्खननाची परवानगी नाही, निविदा काढण्यात आली नसल्याचे सांगीतले. अवैध उत्खनन करणारी एक जेसीबी आणि उत्खननातील मुरुमाची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर असा अंदाजे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करून, बोरगावमंजू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले.